छत्रपती संभाजीराजेंची स्वराज्य संघटना व राष्ट्रीय नेतृत्वाचा पुरंदर किल्ल्याला पदस्पर्श.

मिर्झाराजे जयसिंग यांनी दिल्लीच्या औरंगजेब बादशहाच्या आदेशानुसार स्वराज्यावर स्वारी केली होती हा इतिहास सर्वज्ञात आहे. यावेळी पुरंदर किल्ला अग्रस्थानी होता, याच किल्ल्यावर मुरारबाजी देशपांडे यांनी पराक्रम गाजवला होता. मात्र यावेळी दिल्लीच्या सरदारांचे पाय पुरंदर किल्ल्यावर पडले अन् स्वराज्याला ग्रहण लागले. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना आग्र्याला जावे लागले, पुढे कैद व सुटका हा इतिहास सर्वज्ञात आहे. म्हणजेच दिल्लीचे सरदारांनी पुरंदर किल्ल्यावर तात्पुरते मिळवलेले यश हे स्वराज्यासाठी तात्पुरते ग्रहण ठरले. स्वराज्य संस्थापकांचा या नंतर राज्याभिषेक झाला अन् ते जगमान्य छत्रपती (राजे) झाले. आज हा इतिहास आठवायचे कारण म्हणजे आज पुन्हा पुरंदर किल्ला व स्वराज्य संघटना हा विषय गाजत असून महाराष्ट्राच्या राजकारणात पुढं काय घडणार ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

महाराष्ट्रात प्रथमच घडलेल्या नुकत्याच दोन बातम्यांमुळे चर्चेला उधाण आले आहे. त्यातील पहिली बातमी म्हणजे छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी नवी राजकीय भूमिका मांडण्याआधीच त्यांना तुळजापूर देवस्थान प्रशासनाकडून तुळजाभवानी माता मंदिर गाभाऱ्यात दर्शनासाठी अडवण्यात आले व त्यानंतर त्यांनी स्वराज्य संघटना राज्यभर पसरवण्याची केलेली घोषणा. अन् दुसरी बातमी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड संघटनेकडून आमंत्रण मिळाल्याने प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकावर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दर्शनासाठी गेले. दोन्ही बातम्या महाराष्ट्रातील राजकारण कसे बदलतेय यांचे प्रतिबिंब दाखवणाऱ्या आहेत.

शिवसेना भाजपाच्या विरोधात राजकारण करताना शरद पवार यांनी अनेकदा भगव्या ध्वजाच्या राजकारणाला धार्मिक राजकारणाचे प्रतिक मानून विरोधी भूमिका घेतलेली होती. भाजपा शिवसेना युती मुळे भगव्या झेंड्याचे राजकारण अग्रस्थानी होते तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या झेंड्याबरोबरच भगवा झेंडा लावावा असे आवाहन कार्यकर्त्यांना भाषणातून केले होते. पण लगेचच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व इतर नेत्यांनी ही पक्षाची भूमिका नसल्याचे सांगत सारवासारव केली. मात्र पुढे शरद पवारांचे नातू रोहीत पवार हे कर्जत जामखेड येथून आमदार झाले अन् त्यांनी खर्डा किल्ल्यासमोर स्वराज्य ध्वज नाव देत भव्य मोठा भगवा ध्वज उभारला. नव्या पिढीचे राजकारण व रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीवर जाऊन मोदी यांनी छत्रपतींचा आशिर्वाद घेऊन केलेल्या आवाहनानंतर आलेल्या लाटेनंतरची मतदारांची भूमिका पाहून शरद पवार यांनी पुतणे व नातवाच्या माध्यमातून राजकारणातील पुढील भूमिका बदलास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे व खासदार नवनीत राणा यांच्या भूमिकांमुळे हनुमान चालीसा, हनुमान आरती व मारुती स्तोत्र गाजत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही त्याला पुरक भुमिका घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे हनुमान मंदीरात गेल्याचे फोटो समाज माध्यमातून फिरु लागले. म्हणजेच आजवर नास्तिक असल्याचे भासवणारे शरद पवार यांनाही आस्तिक असल्याचे दाखवावेसे वाटले. कारण मतदारांचा कल हा बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे अस्तिकतेला प्राधान्य देणारा दिसत आहे.

केंद्रातील सत्ताबदल, सुप्रीम कोर्टाचा निकाल यामुळे राममंदिर पुनर्बांधणी सुरू झाली आहे. भाजपाने राममंदिर मुद्यावर राजकारण करत दोन खासदारांवरुन बहुमतापर्यंतचा आकडा गाठला हे पहाता श्रीराम व राममंदिर हे मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रभावी ठरणार हे राजकीय नेत्यांनी ओळखले. त्यामुळे भाजपा बरोबरच शिवसेना अन् आता मनसे नेतेही अयोध्येचा दौरा करून रामभक्त मतदारांचे मन जिंकू पहात आहेत. नुकतेच कॉग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांनाही अयोध्येतील महंतांनी अयोध्येत येऊन श्रीराम दर्शन करण्याचे आवाहन केले अन् त्यांनी ते स्विकारलेही. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्येतील दौरा नियोजित असतानाच नुकतेच शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी अयोध्येत जाऊन श्रीराम दर्शन घेतल्याची बातमी पुढे आली. राममंदिर या मुद्यावर कायमच घुमजाव व विरोधी भूमिका मांडणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू आमदार रोहित पवार यांच्या मार्फत पक्ष कार्यकर्त्यांना नवा संदेश व दिशा दिली आहे.

त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी मराठा क्रांती मोर्चा व मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेत मराठा समाजाला संघटित केले. मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांची नेमकी भूमिका काय व त्यांचे इतर नेते यांची परस्पर विरोधी भूमिका यामुळे मराठा समाजाला छत्रपती संभाजी राजे भोसले हे जास्त प्रामाणिक वाटायला लागले. त्यातून छत्रपती उदयनराजे भोसले यांची राजकीय कोंडी, त्यातूनच छत्रपती उदयनराजे भोसले व छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा भाजपा प्रवेश यामुळे सातारचे छत्रपती घराणे हे आगोदरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून दुरावले गेले. छत्रपती संभाजी राजे भोसले यांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार म्हणून झालेली निवड यामुळे छत्रपती भोसले घराणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून पुर्णपणे दुर गेल्याचे चित्र निर्माण झाले. यातूनच भरात भर म्हणजे छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी वारंवार नवी राजकीय भूमिका व नवा राजकीय पक्ष याबाबत केलेली विधाने अन् नुकतीच स्थापन केलेली स्वराज्य संघटना यामुळे तर महाराष्ट्रातील राजकारण हे छत्रपती भोसले घराणे, मराठा समाज व छत्रपती शिवरायांच्या इतिहासा भोवती फिरतेय हे स्पष्ट होताना दिसत आहे.

म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास व इतिहासाचे लेखन यावरुन आंदोलन करत निर्माण झालेली संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या निमंत्रणाला मान देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार प्रथमच छत्रपती संभाजी महाराज जयंतीला पुरंदर किल्ल्यावर उपस्थित राहीले. संभाजी ब्रिगेड संघटना व शरद पवार यांचे संबंधातील घनिष्ठता म्हणूनच हे शक्य झाले. कारण छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थान पुरंदर किल्ला खासदारकीच्या बारामती मतदारसंघात असताना शरद पवार यांना २०२२ पर्यंत कोणीच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमंत्रण का दिले नाही ? तथा मतदार संघात असूनही शरद पवार हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुरंदर किल्ल्यावर आजवर का गेले नाहीत ?

१९२० साली स्थापन रा.स्व.संघात भगवा ध्वज व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा यांचे नित्य पुजन होत असल्याने संघ परिवारातील भाजपच्या केंद्रस्थानी कायमच त्यांना महत्व दिले जाते. १९६६ साली स्थापन झालेल्या शिवसेना पक्षाच्या नावातच शिव असून छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा इतिहास सांगतच स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाची वाढ केली असल्याने त्यांच्याही अग्रस्थानी भगवा व छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांना अग्रस्थानी मानूनच कॉग्रेसची व त्यातून निर्माण झालेल्या पक्षांची वाटचाल राहीली आहे. मनसे, रिपाइं, वंचित व इतर पक्षांची धेय्य, धोरणे पहाता छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांनीही प्रथम स्थानी ठेवून राजकारण केलेले दिसत आहे.

मात्र नुकत्याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभा व पत्रकार परिषदांमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे छत्रपती शिवाजी महाराज यांचा नामोल्लेख टाळतात असा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शरद पवार यांना त्यांची याबाबतची भूमिका मांडावी लागली. आता खुद्द छत्रपती भोसले घराण्यातील छत्रपती संभाजी राजे भोसले हे वेगळी राजकीय भूमिका व वेगळी स्वराज्य संघटना उभारतात म्हटल्यावर शरद पवार यांना प्रत्यक्ष कृतीतून स्वतः ची प्रतिमा जनतेसमोर स्पष्ट करणे गरजेचे होते. पण आगोदर पासूनच शिवशाहीर स्व. बाबासाहेब पुरंदरे व संघ, शिवसेना, हिंदूत्व प्रेरीत संघटना अन् इतिहासकार यांच्यावर टीका करणारे शरद पवार यांनी (छत्रपती) संभाजी ब्रिगेड यांच्या निमंत्रणाचे औचित्य साधत छत्रपती संभाजी महाराज जयंतीला पुरंदर किल्ल्यावर हजेरी लावली.

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार प्रथमच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुरंदर किल्ल्यावर ही बातमी टिव्ही न्यूज चॅनलने दाखवली. महाराष्ट्रातील सर्व शिवशंभू प्रेमींना यामुळे आनंद झाला असेलच पण यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी बारामतीतील काटेवाडी ते सासवडजवळील पुरंदर किल्ला ही वाट किती काटेरी होती हेही समजले असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रथमच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुरंदर किल्ल्यावर येण्यासाठी प्रेरीत करणाऱ्या (छत्रपती) संभाजी ब्रिगेड संघटनेचे शतशः आभार मानावे तेवढे थोडेच. पुढील काळात (छत्रपती) संभाजी ब्रिगेड की स्वराज्य संघटना महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणार हाच मोठा यक्ष प्रश्न मराठी जणांसमोर असणार आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!