विशेष प्रतिनिधी स्वराज्य वार्ता
मुंबई:- राज्यातील पावणेदोन कोटी रेशनकार्ड धारकांना गौरी-गणपतीच्या सणात १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा शासन निर्णय झाला. त्यात साखर, रवा, हरभरा डाळ व तेल (प्रत्येकी एक किलो) अशा चार वस्तू आहेत. पण, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने हे शिधावाटप थांबले. या वस्तू एकत्रितपणे ज्या पिशवीतून दिल्या जातात, त्यावर सत्ताधाऱ्यांची छायाचित्रे असल्याने अडचण निर्माण झाली होती, पण प्रशासनाने आता हा आनंदाचा शिधा पिशवीविना करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे रेशन धारकांची दिवाळी ही गोड होणार आहे.
राज्य सरकारने दुर्बल घटक, सामान्य नागरिकांना शिधावाटप दुकानाच्या माध्यमातून सण, उत्सवाच्या काळात लागणारे अत्यावश्यक साहित्य किरकोळ दराने वाटप करण्याचे धोरण अवलंबिले होते. सरकारने सण-उत्सवाच्या काळात सामान्य कुटुंबातील रेशन कार्ड धारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचे निर्णय घेतले. गौरी-गणपतीच्या उत्सवातही तसाच निर्णय झाला होता. मात्र, अनेक जिल्ह्यांना तो वेळेत उपलब्ध झाला नाही आणि आता निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने त्याचे वाटप थांबले आहे.
परंतु त्यावर तोडगा काढत साखर, रवा, हरभरा डाळ आणि तेलाच्या पिशवीवर कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांची छायाचित्रे नाहीत, त्यामुळे त्याच्या वाटपाला काहीही अडचण नाही. मात्र, ज्या पिशवीतून या सर्व वस्तू एकत्रितपणे दिल्या जातात, त्यावर पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची छायाचित्रे आहेत. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात या पिशव्या न देता केवळ वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या वस्तू खरेदीच्या वेळी शिधापत्रिकाधारकांना घरून पिशव्या आणण्याच्या सूचना करण्यात येत आहेत.