प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे:- जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे खेड – आळंदी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाकडे जाणार आणि उमेदवार कोण असणार यावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. अखेर खेड – आळंदीची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. आणि अखेर उमेदवार म्हणून नुकतीच बाबाजी रामचंद्र काळे यांच्या नावाची घोषणा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून झाली आहे. तर बाबाजी काळे पदाधिकाऱ्यांसह मुंबईहून मतदारसंघाकडे यायला निघाले आहेत. उद्या २९ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष या दोन पक्षात जागेवरून रस्सीखेच सुरू होती. सर्व्हेमध्ये कोणाच्या नावाला जास्त पसंती आहे यावर ही जागा सुटणार असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इच्छुक उमेदवार बाबाजी रामचंद्र काळे हे गेल्या आठवड्याभरापासून उध्दव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्री आणि शिवसेना भवन मुंबई येथे ठाण मांडून बसले होते. उमेदवारी घेऊनच मतदारसंघात जाणार असा जणू चंग त्यांनी बांधला होता.
मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाच्या सुख दुःखात सहभागी होणारा माणूस म्हणून काळे यांची ओळख आहे. माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे यांच्या निधनानंतर शिवसैनकांना बळ देणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागे शिवसैनिकांनी मोठी ताकद उभी केल्याने तब्बल ४६ हजारापेक्षा अधिक मताधिक्य खेड – आळंदी मतदारसंघात मिळाले. बाबाजी काळे यांच्या रूपाने शिवसेनेने या जागेसाठी आग्रह धरला होता. त्यानंतर आता बाबाजी काळे यांना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळली आहे. एकूणच संपूर्ण मतदारसंघात या निर्णयामुळे मतदारांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे शिवसैनिकांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला आहे.