खेड तालुक्यात वाढतोय बिबट्याचा उपद्रव

खेड वार्ता – : जऊळके (ता. खेड) येथे महिलेवर बिबट्याने हल्ला केला आहे. यामुळे महिला गंभीर जखमी झाली आहे. जऊळकेत गुरुवारी (दि. १२) सकाळी सहा वाजता घडलेल्या या घटनेत लता शिवाजी बोऱ्हाडे (वय ४२) ही महिला रक्तबंबाळ झाली आहे. तिची अवस्था गंभीर असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

दोन दिवसांपूर्वी म्हणजे मंगळवारी (१०) जऊळके लगतच्या रेटवडी गावात दोन बिबट्यांनी दीड तासाच्या अंतराने दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन महिलांवर जीवघेणा हल्ला चढवला होता. यातील एक महिला पुण्यातील ससून रुग्णालयात गंभीर अवस्थेत असताना याच परिसरात आज सकाळी दुसरा हल्ला झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यानंतर बिबट्याची माहिती घेऊन उपाययोजना करण्यासाठी राजगुरूनगर वनविभाग व माणिकडोह येथील वनविभागाच्या अधिकारी पथकाने परिसर पिंजून काढला. तसेच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोन ठिकाणी पिंजरे लावले. मात्र बिबट्या हाती येण्याऐवजी दुसरा हल्ला झाल्याने वनविभागाचे प्रयत्न वाया गेले आहेत.

गुरुवारी सकाळी घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी पी एस रौन्धळ, दत्तात्रय फापाळे, शिवाजी राठोड, संदीप अरुण आदींचे पथक घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत ग्रामस्थांनी जखमी महिलेला उपचारासाठी चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.

चासकमान धरणाचा डावा कालवा या परिसरातून जातो. पाण्याची मुबलकता असल्याने शेतकऱ्यांनी बागायती पिके घेतली आहेत. लोडशेडिंगमुळे पिकांना रात्री पाणी द्यावे लागते. मात्र या घटनांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. दोन दिवसांत घडलेल्या घटना व नागरिकांच्या माहितीनुसार या परिसरात दोन बिबट्यांचा वावर आढळुन येत आहे. बिबट्याची रात्रीची दहशत होतीच परंतु आता मात्र, दिवसा देखील बाहेर पडायला नागरिक घाबरू लागले आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना कराव्यात अशा सुचना दिल्या आहेत.

जीवघेणा हल्ला नागरिक सहन करत आहेत. वनप्रशासनाची दिरंगाई आढळली तर कडक कारवाई करावी लागेल. गावाच्या भर वस्तीत जिल्हा परिषद शाळा असुन समोर महिलेचे घर आहे. सकाळी उठून घराबाहेर आल्याबरोबर बिबट्याने तिच्यावर हल्ला चढवला.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!