महाराष्ट्र ही भूमी पुरातन काळापासून कणखर काळा पाषाण व मरहट्ट मावळ्यांच्या इतिहासाची साक्ष देणारी आहे. हडप्पा संस्कृतीशी जवळीक असणाऱ्या माळवा व जोर्वे संस्कृतीचे अवशेष महाराष्ट्रात प्रकाशा, इनामगाव, जोर्वे, दामियाबाद येथे सापडलेले आहेत. सापडलेले आवशेषांनुसार येथील मुख्य संस्कृती ही मातृपुजक असल्याचे पुरावे आढळून आले आहेत. विशेषतः नांदेड माहूरची रेणुका माता, नाशिक वणीची सप्तशृंगी माता, तुळजापुरची तुळजाभवानी माता, कोल्हापूरची अंबामाता तसेच महाराष्ट्रातील गावोगावी असणारी अनेक मातृकादेवता मंदीर ही महाराष्ट्राची श्रद्धास्थाने राहीली आहेत.
महाराष्ट्राचे प्रथम राजे सातवाहन (शालिवाहन) यांची नावे ही त्यांच्या मातेच्या नावानेच ओळखली जातात. सातवाहन घराण्यातील तेवीस राजांतील गौतमीपुत्र सातकर्णी हे त्यांच्या पराक्रमामुळे प्रसिद्ध असून त्यांच्या आईचे नाव गौतमी होते. तसेच महाराष्ट्रातील बहुतांश किल्ले व लेणी त्यांनीच निर्माण केली असून त्यावर मातृका देवतांची स्थाने आहेत, उदाहरणार्थ चांवंडवर चामुंडा माता, जीवधनवर जीवाई माता, शिवनेरीवर शिवाई माता, पेमगिरीवर पेमाई माता.
सातवाहन घराण्यानंतरचे महारठी, नाग, महाभोज, शिंद, वाकाटक, कालाचुरी, चालुक्य, राष्ट्रकुट, शिलाहार, गोंड, यादव या सर्वच राजघराणी ही बौद्ध, जैन व हिंदू धर्माशी जवळीक साधणारी असली तरी देखील मातृकापूजनात सातत्य राखून होती. महाराष्ट्र म्हटला की छत्रपती शिवाजी महाराज व भोसले घराणे यांचा इतिहास हा अग्रस्थानी मानला जातो. भोसले घराणे हे देखील मातृपुजक असल्याने राजमाता जिजाऊ यांना मोतोश्री म्हणजेच मातृदेवतेचे स्थान छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेले दिसून येते. छत्रपती व महाराष्ट्राचे श्रद्धास्थान तुळजाभवानी माता असून छत्रपती शिवाजी महाराज यांची भवानी तलवार हा इतिहास व आख्यायिका दोन्हीही याचेच दाखले देतात.
आजही ही राजघराणी घराणी महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेत आहेत. सातारचे छत्रपती उदयनराजे व शिवेंद्रराजे, कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे हे महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत. महाराष्ट्रावरील अनेक संकटसमयी छत्रपती घराण्यातील व्यक्ती व सामान्य नागरिक हे आई तुळजाभवानी माता मंदिरात दर्शनासाठी जात असतात. तुळजापूर हे छत्रपती घराणे व महाराष्ट्रातील भक्तजनांचे श्रद्धास्थान असल्याने सर्वचजणांचे आई तुळजाभवानी मातेवर पुत्रवत प्रेम आहे.
नुकतीच एक बातमी समाज माध्यमातून व टिव्ही न्यूज चॅनलवरुन महाराष्ट्रात पसरली की, छत्रपती संभाजी राजे भोसले यांना या श्रद्धास्थानावर दर्शनासाठी अडवले. वास्तविक अफजलखानाच्या स्वारीच्या कठीण प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांनी तुळजापूर येथे जाऊन तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले होते हा इतिहास आहे. छत्रपतींना अफजलखानही तुळजाभवानी मातेचे दर्शन घ्यायला अडवू शकला नाही व नंतर तर छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा वध करून पुन्हा तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले हा इतिहास आजही सर्वांना प्रेरणा देणारा आहे.
असा इतिहास असताना छत्रपती संभाजी राजे भोसले यांना तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात का आडवलं गेले हा प्रश्न सर्वांनाच भेडसावत आहे. वास्तविक मंदिरे ही ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असल्याने तेथे सरकारने परंपरा व रुढी यांचा विचार प्रथम होणे गरजेचे आहे. गावागावात मंदिर गाभाऱ्यात पुजेचा मान, गाडी बगाड चा मान, बैल गाड्यांचा मान एखाद्या कुटुंबात परंपरेने असतो. तसेच तुळजाभवानी माता व छत्रपती भोसले घराणे यांचे अतुट नाते पहाता छत्रपती घराण्यातील व्यक्तीला यापूर्वी गाभाऱ्यात प्रवेश कधीही नाकारलेला नाही. भट ब्राम्हणांच्या अधिपत्याखाली देखील छत्रपती घराण्यातील व्यक्तीला गाभाऱ्यात प्रवेश नाकारला गेल्याचे ऐकिवात नाही.
कारण कोणतेही असो पण आता तुळजापूर देवस्थान हे महाराष्ट्र शासन व प्रशासन यांच्या नियंत्रणाखाली असल्याने आता त्यांना कोणा पुजारी वा पंडीतावर हे प्रकरण ढकलता येणार नाही. तसेच याला जातीयवाद वा ब्राम्हणवादाचा रंगही देता येणार नाही. तथा या प्रकरणी धर्माचा ही रंग देणे चुकीचे ठरेल. म्हणजेच यातील कुठलेही कारण नसेल तर का अडवणूक केली असेल ? छत्रपती संभाजी राजे भोसले यांना आडवायची आता वेगवेगळी कारणे व नियम सांगितले जातील.
जर यामागे राजकारण असेल तर मग काय राजकीय कारण असू शकेल ? तत्पुर्वी त्यांचे राजकारण व समाजकारण यांचा प्रथमतः मागोवा घेणे गरजेचे आहे. यात प्रामुख्याने छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी सातत्याने पुढाकार घेतलेला आहे. छत्रपती संभाजी राजे भोसले हे राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार असून त्यांनी राजभवनावर महाराष्ट्र रथाचे नियोजन करत छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा इतिहास साकारण्यात पुढाकार घेतला होता. महाराष्ट्रातील किल्ले संवर्धन, यात रायगडावरील पुरातत्त्वीय संशोधन व राजगडावरील पुर्नबांधनी यातही ते अग्रेसर आहेत. सारथी संस्था व त्यासाठीचा निधी यासाठी ते कायम आक्रमक भूमिका घेत आहेत. पण ही कामे तर यापुर्वी होत होती मग आताच अडवणूक का ?
छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी मराठा क्रांती मोर्चा व मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले हे जगजाहीर आहे. यातूनच त्यांना राजकारण, राजकारण्यांची भुमिका व राजकीय दृष्टीकोन यांचा प्रत्यय आला. म्हणूनच त्यांनी नव्या राजकिय भुमिका व नव्या राजकीय पक्षाचा विचार मांडायला सुरुवात केली. छत्रपती संभाजी राजे भोसले यांचा हाच दृष्टीकोन महाराष्ट्रातील प्रस्थापित व मराठा समाजाच्या मतांवर सत्तेची चव चाखणारांना झोंबला असेल का ? आई तुळजाभवानी माता ही सर्वसाक्षी असल्याने ती सर्व जाणत असेलच, आपण याबाबत कुठलीही भुमिका मांडणे सर्वस्वी चुकीचे ठरेल. मात्र शेकडो वर्षांच्या इतिहासात प्रथमच छत्रपती भोसले घराण्यातील व्यक्तीला तुळजापूरात गाभाऱ्यात दर्शनासाठी अडवले गेले हा काळा डाग महाराष्ट्र व मराठी जणांच्या हृदयात घर करून बसणार हे नक्की.