जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९७४. यांच्या कलम ४ च्या पोट-कलम (२) च्या खंड (घ) आणि कलम ५ याद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाचे सह सचिव सुर्यकांत कि. निकम यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य म्हणून खेड तालुक्यातील नितीन गोरे यांची निवड केली.
नितीन गोरे हे स्वर्गिय आमदार सुरेश गोरे यांचे बंधू असल्याने त्यांच्या निवडीमुळे स्वर्गिय आमदार सुरेश गोरे यांचे समर्थक समाज माध्यमातून आपला आनंद व्यक्त करत आहेत. स्वर्गिय आमदार सुरेश गोरे यांच्या निधनानंतर त्यांचे समर्थक हे त्यांचे वारसदार म्हणून नितीन गोरे यांच्याकडे पहात आहेत. अशातच महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य म्हणून नितीन गोरे यांची निवड झाल्यामुळे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
कृषि आणि उद्योग यांच्या हितसंबंधाचे प्रतिनिधीत्व करणारे सदस्यांची निवड या मंडळावर केली जाते. यामध्ये नितीन गोरे यांची निवड शेती (कृषी) क्षेत्रातून तर आदित्य शिरोडकर यांची निवड उद्योग क्षेत्रातून केली गेली आहे. नामनिर्देशन दिनांकापासून तीन वर्षाच्या मुदतीकरिता सदर नामनिर्देशन महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार करण्यात आले आहे. तशी अधिसूचना महाराष्ट्र शासनाने पत्रक काढून जाहीर केली आहे.
खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतून होणारे जलप्रदूषण, शेती पीकावरील किटकनाशकांच्या अति वापरातून होणारे जलप्रदूषण, कचरा डेपो व रहिवासी क्षेत्रातील सांडपाणी यातून होणारे जलप्रदूषण, पाणवनस्पतीमुळे होणारे नदीपात्रातील जलप्रदूषण व अति वाळू उपसा केल्यामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी या सदस्यात्वाचा खेड तालुक्याला निश्चितच फायदा होईल अशी आशा नागरिकांना आहे. आळंदीतील इंद्रायणी नदीचे पाणी पवित्र मानून स्नान व आचमन करणाऱ्या भाविकांच्या अपेक्षा देखील वाढीस लागल्या आहेत. नितीन गोरे यांना चाकण नागरी सहकारी पतसंस्थेतील चेअरमनपदाचा अनुभव व घराण्याचा वारसा असल्याने सर्वांनाच त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहेत.
