दिलीपबाबू इंगोले लोकसंग्रह कमाविलेला हृदयसम्राट – ना.यशोमती ठाकूर, सोहळ्यात दिलीपबाबूंच्या जीवनकार्याला जनसमुदायाचे वंदन

अमरावती – महेश बुंदे

श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या विहंगम कार्यासह चौफेर क्षेत्रात कार्यरत असणारे व्यक्तिमत्त्व दिलीपबाबू इंगोले आम्हाला सुसंस्कृत आणि योग्य दिशा देणारे वडीलधारी मार्गदर्शक असून त्यांची विविध क्षेत्रातील कामगिरी लक्षात घेता दिलीपबाबू म्हणजे ‘बाप माणूस’ असे मान्य करावे लागेल, हा भाव महाराष्ट्राच्या महिला व बाल कल्याण मंत्री ना.यशोमती ठाकूर यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष श्री.दिलीपबाबू इंगोले
यांच्या ७२ व्या जन्मदिनानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात बोलतांना मनोगतातून व्यक्त केला.

स्थानिक मातोश्री विमलाताई देशमुख सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलतांना श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन उपाख्य भैय्यासाहेब देशमुख यांनी संस्थेच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणारे व्यक्तिमत्त्व दिलीपबाबू इंगोले आम्हाला सुसंस्कृत आणि योग्य दिशा देणारे मार्गदर्शक आहेत.

आम्ही संस्थेच्या महत्वपूर्ण पदावर काम करणारे दोघेही सर्वकार्यकारिणी व संस्थेचे सर्व सन्माननिय सभासद यांना विश्वासात घेऊन संस्थेला अधिकाधिक प्रगतीपथावर नेण्यासाठी वचनबध्द असल्याचे सांगून यामध्ये दिलीप बाबू यांच्या अनुभवाचा मोठा वाटा असल्याची प्रांजळ कबूली सभागृहाला देऊन त्यांनी संस्थेचा चालता – बोलता पण नियमपूर्ण ज्ञानकोष असा भावपूर्ण उल्लेख करून त्यांचे अभिनंदनही केले. दिलीपबाबूंचे जिवलग मित्र तथा कार्यक्रमातील प्रमुख वक्ते माजी मंत्री डॉ.सुनील देशमुख यांनी मैत्रीपूर्ण जीवनाच्या काही आठवणींना उजाळा देऊन त्यांच्या बहुआयामी कार्यावर प्रकाश टाकला.

अमरावतीच्या विद्यमान आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनीही याप्रसंगी मनोगताद्वारे समयोचित शब्द पुष्पे अर्पण केली.

यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती दिलीपबाबू इंगोले व त्यांच्या पत्नी सौ. प्रेरणाताई, मुलगा अक्षय यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, डॉ.रामचंद्र शेळके, अँड गजाननराव पुंडकर, कार्यकारिणी सदस्य श्री.हेमंत काळमेघ, केशवराव गावंडे, केशवराव मेतकर, सचिव शेषराव खाडे, स्विकृत सदस्य प्राचार्य डॉ. महेंद्र ढोरे, नरेशचंद्र पाटील, डॉ.पी.एस. वायाळ, डॉ. अमोल महल्ले, माजी प्राचार्य भा.वा. चौखंडे, आयोजन समितीचे विनायकराव पुंडकर, रमेशराव सोळंके, अशोकराव देशमुख, अशोकराव गावंडे, रमेशराव किटुकले, प्रतिक खुरद यांचीही उपस्थिती होती .प्रारंभी संस्थेच्या मुख्य कार्यालयातून श्री.दिलीपबाबू इंगोले यांना टाळ मृदुंगाच्या गजरात आकर्षक दिंडीने समारंभस्थळी आणण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते दिलीपबाबू इंगोले यांचा शाल, श्रीफळ, गौरव चिन्ह, सन्मानपत्र अर्पण करून परीवारासह भव्य पुष्पहाराने नागरी सत्कार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. या दिवशी कार्यक्रमा अगोदर उपस्थितांना सोहळ्या निमित्य दुपारी दिलीपबाबू यांची प्रा. कल्याणी राजाभाऊ गावंडे यांनी अकोल्याच्या अभियांत्रिकी व तोत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने घेतलेली मुलाखत तसेच दिलीपबाबू यांच्या नेत्रदिपक जीवन कार्याचा वेध घेणारी चित्रफित उपस्थितांना दाखविणे ही सर्वांसाठी पर्वणीच ठरली .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष तथा स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानचे सचिव हेमंत काळमेघ यांनी तसेच गाडगेबाबा मंडळाचे अध्यक्ष प्रा.गजानन भारसाकळे लिखित सन्मानपत्राचे वाचन श्रीमती कीर्ती काळमेघ यांनी केले. सूत्रबद्ध संचालनाचे कर्तव्य डॉ.मंदा नांदुरकर व डॉ. नरेंद्र माने यांनी संयुक्तपणे तसेच ऑनलाईन यंत्रणा यशस्वी सांभाळून प्रा .डॉ .मंदार देशमुख या सर्वांनी वाहवा मिळविली. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकरिणी सदस्य केशवराव मेतकर यांचे प्रमुख मार्गदर्शनात संस्थेच्या कार्यालयापासून ते कार्यस्थळा पर्यंत घेऊन येणाऱ्या टाळमृदुंग व गणवेशातील पुरुष – महिला आकर्षक दिंडी मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधले . प्रा. डॉ राजेश उमाळे व संच यांनी गायिलेल्या स्वागतगीताने प्रारंभ झालेल्या या सोहळ्याची सत्कार समितीचे सहकार्यवाह विनायकराव पुंडकर यांच्या आभार प्रदर्शनाने तथा प्रा. गजानन भारसाकळे यांनी गायिलेल्या राष्ट्रवंदनेने सांगता झाली .

बुलढाणा पासून नागपूर पर्यंत व्यापलेल्या परीसरातून आमंत्रित सर्वआप्तेष्ट, मित्रमंडळी यांनी तसेच बहुसंस्थेने आंमत्रित तथा उपस्थित अमरावतीकरांनी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद गावंडे यांच्या देखरेखखाली आयोजिलेल्या स्नेह भोजनाचा लाभ घेऊन आयोजन सत्कार समितीस उपकृत केले .या वैशिष्टपूर्ण नेत्रदिपक सोहळ्यास अमरावती स्थानिक व विभागातील जवळपास सर्वच गणमान्य पुरुष – महिला , श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद , सर्व प्राध्यपक तथा कर्मचारी वर्ग , दि डॉ पंजाबराव देशमुख अर्बन कॉ . बँकेचे सभासद , संचालक मंडळाचे पदाधिकारी व कर्मचारी तसेच इंगोले परिवाराचे स्नेही यांची बहुसंख्येने उपस्थिती लाभल्याने हा सोहळा धन्य पावला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद श्रीरामपंत भटकर , बबनराव चोधरी , राजाभाऊ सुंदरकर यांचे मार्गदर्शनात प्रमोद धांडे बाप्पू , प्रा . आर . वाय देशमुख ,नरेंद्र इंगोले , श्रीकांत देशमुख , नितीन विधळे , स्वप्नील देशमुख , आदित्य बारब्दे , अनिल कराळे , यशवंत भोंडे , विकास शिंगणे , राहुल जवंजाळ , कु.अनुश्री काळे , डॉ पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टीटयूट अमरावती येथील प्राध्यापक , कर्मचारीवृंद व संपूर्ण विद्यार्थी गण तसेच कृषी महाविद्यालय अमरावती यांचे मोलाचे सहकार्य लाभले. नागरी सत्कार समितीने दिलीपबाबू यांच्या भावपूर्ण सत्काराचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्धल सर्व उपस्थितांनी नागरी सत्कार समितीचे कौतुक व अभिनंदन केले .


हा सत्कार माझ्या आयुष्यातील अनमोल क्षण – दिलीपबाबू इंगोले

राजकारण आणि समाजकारणाचा माझ्या जीवनात खोलवर संबंध राहिला परंतु मी समाजकारणाला महत्त्व दिले. संस्था महत्त्वाची म्हणून संस्थेचे काम केले.संस्थेत स्वतःचे पूर्ण अस्तित्व झोकून दिल्याशिवाय काम होत नाही.संस्था हा मोठा गाडा असून संस्थेचा विकास कसां होईल, हाच माझा प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे. सकारात्मक विचाराने काम केल्यास संस्थेचा मोठा विकास शक्य होईल. आपण पुढे संस्थेचे कार्य समर्पित भावनेने करू. आपले पुढील आयुष्य संस्थेसाठीच असेल. आपण माझ्यावर दाखविलेला विश्वास आणि दिलेल्या प्रेमाबद्दल मी आपला सदैव ऋणी राहील. हा भव्यदिव्य सत्कार हा माझ्या आयुष्यातील अनमोल क्षण आहे, या शब्दात दिलीपबाबू इंगोले यांनी आपल्या भावना व्यक्त करून व आयोजन समिती अध्यक्ष हेमंत काळमेघ यांचे विशेष आभार मानून सत्काराला उत्तर दिले.


बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!