पुणे वार्ता:- राज्यातील मोठ्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे ,पिंपरी चिंडवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा समावेश आहे.
नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी काही दिवसांपूर्वीच बदलीची मागणी केली होती. घरगुती कारणांमुळे बदली करण्याची विनंती त्यांनी केली होती. त्यानुसार आता त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता नाशिक पोलीस आयुक्त म्हणून जयंत नाईकनवरे यांची नियुक्ती करण्यात आलीय. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडचे धडाकेबाज पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचीही बदली झालीय. त्यांच्या जागी आता अंकुश शिंदे हे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. कृष्ण प्रकाश यांची विशेष पोलीस महानिरीक्षक VIP सुरक्षा, मुंबई इथं बदली करण्यात आली आहे.
संदीप कर्णिक पुण्याचे नवे सह पोलीस आयुक्त
संदीप कर्णिक पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक असताना माळवमध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता. त्या घटनेमुळं राज्याचं राजकारण हादरुन गेलं होतं. त्यानंतर संदीप कर्णिक यांची तातडीने बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता कर्णिक यांची पु्ण्याचे नवे सह पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना पदोन्नती देण्यात आलीय. त्यांच्या जागी सुहास वारके यांच्याकडे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सह पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
उस्मानाबादच्या जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती नीवा जैन यांचीही बैदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता अक्षय शिंदे हे उस्मानाबादचे नवे पोलीस अधीक्षक असणार आहेत.राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशाने शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी बुधवारी (दि.20) याबाबचे आदेश काढले आहेत.
