दर्यापूर – महेश बुंदे
नजीकच्या कोकर्डा ग्रामपंचायतीमधील अमरावती जिल्हा परिषदेच्या शाळापूर्व तयारी उपक्रमांतर्गत प्राथमिक शाळा कोकर्डा येथे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षी दाखल होणाऱ्या मुलांचे औक्षण करत शाळेत दाखल करून घेण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या काळात शाळा पुर्णतः बंद होत्या. काही काळानंतर शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आल्या होत्या.

यानंतर डिसेंबर २०२१ मध्ये अनेक ठिकाणी शाळा तसेच महाविद्यालयीन वर्ग पूर्ववत सुरू झाले, मात्र याचवेळी अंगणवाडी प्रवेश येथील शिक्षण अद्यापही सुरू झालेले नाही. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत नव्याने दाखल होणारी मुले हे अंगणवाडी मध्ये गेलेली नाहीत. त्यामुळे या मुलांना शाळेविषयी काहीही माहिती नाही. ते आता सरळ शाळेत इयत्ता पहिली मध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद बुनियादी प्राथमिक शाळा कोकर्डा येथील मुख्याध्यापक शांतीरक्षक अर्जुन डोगरदिवे यांनी पुढाकार घेऊन शाळा पूर्व तयारी उपक्रमांतर्गत या मुलांना शाळा आपलीशी वाटली पाहिजे व शाळेबद्दल त्यांच्या मनात भीती राहू नये म्हणून या वर्षी जून ऐवजी एप्रिल मध्येच या नवीन मुलांना शाळा पूर्वतयारी व्हावी म्हणून प्रभातफेरी कडून त्यांचे औक्षण करून शाळेत दाखल करून घेतले.

यावेळी ही मुले नवीन पाहुणे असल्याने त्यांचे गुलाब पुष्प व खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा कोकर्डा येथे संपन्न झालेला या कार्यक्रमाला उपसरपंच राजू सोळंके, सदस्या प्रमिला मधुकर नाईक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज पानतावणे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष लता श्रीकृष्ण तायडे, समिती सदस्य योगिता प्रकाश तळोकार, गणेश श्रीनाथ, संगीता चव्हाण, विद्या प्रफुल बिजवे, मुख्याध्यापक शांती रक्षक डोंगरदिवे, महेन्द्र उके, शेंडे, व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
