डॉ.बाबासाहेब आंबेडकर : महिलामुक्तीचे शिल्पकार

प्रतिनिधी फुलचंद भगत

“मी कोणत्याही समाजाची प्रगती हि त्या समाजातील महिलांनी किती प्रगती केली यावरून ठरवतो.” – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांच्या प्रगतीसाठी व त्यांच्या उत्थानासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर किती गंभीर होते हे त्यांच्या वरील विचारावरून दिसून येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज सुधारणेची व्याख्या विस्तृतपणे केली होती. समाज सुधारणा करायची असेल तर केवळ एकाच बाबीवर लक्ष केंद्रित करून सुधारणा होणार नाही. तर समाजात जे जे अनिष्ट विचारप्रवाह आहेत ते नष्ट करणे व योग्य त्या नवीन विचारांची कास धरणे महत्वाचे आहे.असे त्यांना वाटत होते. अशा अनेक विचारप्रवाहांपैकी स्त्रियांच्या प्रगतीचा विचार त्यांनी मांडला.

भारतामध्ये स्त्रीवादाविषयी कोणीतीही स्पष्ट भूमिका नसतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीयांच्या सशक्तिकरणासाठी असे कार्य केलेले आहे ज्याद्वारे आज भारतीय स्त्री प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असल्याची पहावयास मिळते.विसाव्या शतकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असे पहिले व्यक्ती होते ज्यांनी अनिष्ट अशा पितृसत्ताक पद्धतीला खुले आव्हान दिले होते. असे असूनसुद्धा आजही बाबासाहेबांना भारतात स्त्रीवादाचे शिल्पकार मानले जात नाही. हे खरे तर दुर्देवच म्हणावे लागेल.

लोकांनी त्यांना फक्त दलितांचे नेते आणि संविधान निर्माते ईथपर्यंतच सीमित केले आहे. वास्तविक पाहता त्यांनी भारतातील महिलांच्या प्रगतीसाठी जेवढे कार्य केले तेवढे कार्य कदाचित इतर कोणी केले असेल. जेव्हा भारतीय समाजाने महिलांना चार भिंतीच्या आत कोंडून ठेवले होते. अशा अवस्थेत त्यांनी महिलांना जगाची ओळख करून देण्याचे काम केले. यावरून त्यांच्या आधुनिक विचारप्रणालीचा व दूरदृष्टीचा अंदाज आपण लावू शकतो.


बाबासाहेबांनी शिक्षणाच्या जोरावर भारतातील महिलांचे जीवन घडविले. पुरुषांच्या शिक्षणाप्रमाणेच ते महिलांच्या शिक्षणासाठी आग्रही होते. कारण त्यांना शिक्षणाचे महत्व माहित होते. १९१३ मध्ये न्युयोर्कमध्ये भाषण देतांना त्यांनी म्हटले होते कि, “आईवडील आपल्या मुलांना जन्म देतात पण कर्म देत नाहीत. आई हि मुलाच्या जीवनाला आकार देऊ शकते. आपणास मुलासोबत मुलींनासुद्धा शिकवायला पाहिजे. हि गोष्ट जर आपण आपल्या मनावर कोरून ठेवली व तशी कृती केली तर समाजाची प्रगती हि अधिक गतीने होईल.” बाबासाहेबांनी बाळगलेले हे स्वप्न आज पूर्णत्वास जातांना दिसत आहे. आज भारतातील मुली दर्जेदार शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहून विविध क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवत आहेत.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा न्युयोर्कमध्ये शिक्षण घेत होते तेव्हा ते त्यांच्या वडिलांच्या मित्राला पत्र लिहितांना म्हणतात, “ लवकरच भारत आपल्या विकासाचा मार्ग स्वत: निश्चित करेल. पण ह्या आव्हानाला पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम भारतातील स्त्रियांच्या शिक्षणाचा सकारात्मक विचार करून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. १८ जुलै १९२७ मध्ये जवळपास तीन हजार महिलांच्या कार्यक्रमात बाबासाहेबांनी म्हटले होते कि, “ स्त्रियांनी आपल्या मुलामुलींना शाळेत पाठवायला पाहिजे. शिक्षण हे पुरुषासाठी जेवढे महत्वाचे आहे तेवढेच ते स्त्रीसाठीसुद्धा महत्वाचे आहे. जर तुम्हाला लिहिता वाचता आले तरच तुमचा समाजात उद्धार शक्य आहे. आपल्या घरातील स्त्री हि शिक्षणापासून वंचित न ठेवणे व तिला शिक्षण घेण्यास प्रोत्साहन देणे हे घरातील वडिलांचे प्रथम व आद्यकर्तव्य असले पाहिजे. लग्नानंतर प्रत्येक स्त्री स्वतःला गुलाम किवा परावलंबी समजण्याचे सर्वात महत्वाचे कारण हे निरक्षरता आहे. जर स्त्री शिकली तर तिला आत्मसन्मान मिळेल व ती स्वावलंबी होईल.


भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांच्या परंपरेला बाबासाहेबांनी पुढे नेण्याचे अमूल्य कार्य केले. गतकाळामध्ये महिलांना मूर्ख व कपटी स्वभावाचे मानले गेले होते. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले गेले होते. पण बाबासाहेबांनी याविरुद्ध आवाज उठविला. १० नोव्हेंबर १९३८ मध्ये बॉम्बे लेजीस्लेटीव असेम्ब्लीमध्ये त्यांनी महिलांच्या समस्येशी संबंधित अनेक महत्वाच्या मुद्द्यांना प्रकाशझोतात आणले. महिलांच्या प्रसुतीच्या बाबतीत व त्यांच्या स्वास्थ्याविषयी त्यांनी आपले विचार मांडले. याचा परिणाम म्हणून १९४२ मध्ये प्रसूती रजेचे बिल पास करण्यात आले. याचे संपूर्ण श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाते. त्यानंतर १९४८ मध्ये राज्य कर्मचारी विमा कायद्यांतर्गत ‘मातृत्व अवकाश’ हे बिल पास करण्यात आले. विशेष म्हणजे जगातील अनेक प्रगत देश स्त्रीयांच्या या सुविधांपासून अनभिज्ञ होते. अमेरिकेसारख्या प्रगत देशात हा कायदा नव्हता. १९८७ मध्ये न्यायालयाच्या आदेशाने तेथील महिलांसाठी प्रसूती रजेचा मार्ग मोकळा झाला होता. अमेरिकेने १९९३ मध्ये कुटुंब आणि प्रकृती रजा कायदा तयार करून प्रसूती रजा पगारी पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला होता. पण बाबासाहेबांनी हेच काम १९४० च्या दरम्यान केलेले होते. यावरून बाबासाहेबांची महिला उत्थानासाठीची दूरदृष्टी दिसून येते.


बाबासाहेबांनी भारतीय स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत समान अधिकार दिले आहेत. भारतीय समाजातील लैंगिक असमानता नष्ट करण्यासाठी त्यांनी संविधानात लिंगाच्या आधारावर भेदभाव न करण्याचा कायदा निर्माण केला. अनुच्छेद १४ ते १६ नुसार महिलांना समाजात समान अधिकाराचा वाट देण्यात आला आहे. कोणत्याही स्त्रीला ती फक्त स्त्री आहे म्हणून वंचित ठेवता येणार नाही. तसेच लिंगाच्या आधारावर तिच्यासोबत कोणताही भेदभाव केला जाणार नाही असे त्यांनी संविधानात नमूद केले आहे. त्यांनी संविधानात महिलांच्या शोषणाविरुद्ध कायदे निर्माण केले. महिलांच्या व मुलामुलींच्या प्रगतीसाठी राज्यांनी विशेष कृती कार्यक्रम राबवावे यासाठी त्यांनी संवैधानिक परवानगी दिली.


संपूर्ण जगात मतदानाच्या अधिकारासाठी २० व्या शतकात वेगवेगळी आंदोलने झाली. स्त्रीवादाच्या पहिल्या व दुसऱ्या क्रांतीमध्ये महिलांच्या मताधीकारासाठी खूप आवाज उठविला गेला. पण भारतात यावेळेस मतदानाच्या अधिकारासाठी कुठलेही आंदोलन झाले नव्हते. जेव्हा बाबासाहेबांनी संविधान निर्माण करण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी संविधानाद्वारे महिलांना समान मताधिकार दिला. स्वित्झर्लंड सारख्या देशातील महिलांना १९७१ मध्ये मतदानाचा अधिकार मिळाला. पण बाबासाहेबांनी तो अधिकार संविधान निर्माण करतानाच मताधिकार दिला. त्याचा परिणाम असा कि आज अठरा वर्षाची मुलगीसुद्धा मतदानाचा हक्क बजावते. हि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची देण आहे.


संविधान अस्तित्वात नसतांना जे अधिकार महिलांना नाकारले होते तेच अधिकार बाबासाहेबांनी महिलांना दिले. त्यांनी राजकारण व संविधानाद्वारे समाजात स्त्री व पुरुषांमध्ये असलेली खोल दरी बुझविण्याचा अथक प्रयत्न केला. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रींच्या हितांचे रक्षण केले. हिंदू कोड बिलामध्ये त्यांनी बहुविवाहाची प्रथा संपवून एकल विवाह प्रथा असावी, महिलांना संपत्तीमध्ये अधिकार द्यावा, मुल दत्तक घेण्याचा अधिकार असावा, पुरुषासारखेच स्त्रीलासुद्धा घटस्फोट घेण्याचा अधिकार असावा, आधुनिक व प्रगतीशील विचारधारेनुसार समाजाला एकत्र करून मजबूत करावे या महत्वाच्या मुद्द्यांना हात घातला होता. जेव्हा महिलांना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीतील समान हिस्सा मिळेल, त्यांना पुरुषाबरोबरचे समान अधिकार मिळतील, महिलांना त्यांच्या कुटुंबात व समाजात समान दर्जा मिळेल, शिक्षण व आर्थिक उन्नती त्यांच्या कामात मदत करेल तेव्हाच स्त्रियांची खरी प्रगती होईल व खरी लोकशाही नांदेल असे डॉ. बाबासाहेबांचे स्पष्ट व प्रखर मत होते. परंतु महिलांच्या उन्नतीसाठी असलेले हिंदू कोड बिल पास होऊ शकले नाही. याचे डॉ. बाबासाहेबांना अत्यंत दु:ख झाले व त्यांनी ७ सप्टेंबर १९५१ साली आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर १९५५-५६ साली हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यांना हिंदू विवाह अधिनियम, हिंदू घटस्फोट अधिनियम, हिंदू उत्तराधिकारी अधिनियम, हिंदू दत्तकग्रहण अधिनियम या वेगवेगळ्या स्वरुपात पारित करण्यात आले. महिलांना वडील व पतीच्या संपत्तीत वाटा देणे, घटस्फोटाचा अधिकार व मुल दत्तक घेण्याचा अधिकारही बाबासाहेबांनी दिला.


भारतीय समाजात असणाऱ्या असहाय्य महिलांनी उठून लढावे यासाठी बालविवाह व देवदासी यासारख्या प्रथांच्या विरोधात आवाज उठविला. २० जानेवारी १९४२ मध्ये डॉ. बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय दलित महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

ज्यात जवळपास २५००० महिलांनी भाग घेतला. एवढ्या मोठ्या संख्येने महिला एकत्र येणे हि खूप मोठी प्रशंसनिय बाब होती. महिलांमध्ये जागृती करण्यावर खूप विश्वास आहे. चुकीच्या सामाजिक प्रथा नष्ट करण्यासाठी महिलांचे मोठे योगदान असू शकते. अशा शब्दात त्यांनी उपस्थित महिलांची स्तुती केली. डॉ. बाबासाहेबांनी जेव्हा समाज सुधारणेचे काम हाती घेतले होते तेव्हाच त्यांनी पुरुषांबरोबर स्त्रीयानासुद्धा पुढे नेण्याचा निश्चय केला होता.यावरून स्त्रीचे समाजात स्थान किती महत्वाचे आहे ते त्यांनी भारतीय समाजाच्या निदर्शनास आणून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पहिले अध्ययनकर्ते आहेत ज्यांनी भारतीय संरचेत महिलांच्या स्थितीला लिंगाच्या दृष्टीकोनातून समजण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अनेक विचारांपैकी ‘महिला सबलीकरण’ हे एक महत्वाचे विचारमंथनाचे सार होते. महिला उत्थानासाठी व त्यांच्या प्रगतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग एखाद्या योध्यापेक्षा कमी नव्हता. सामाजिक न्याय, सामाजिक ओळख, समान संधी, संवैधानिक स्वातंत्र्याच्या रूपाने महिला सशक्तीकरणात त्यांचे योगदान पुढील अनेक पिढ्यानपिढ्या लक्षात राहील. अशा या महान योद्ध्यास त्यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन.महिलांमध्ये जागृती करण्यावर खूप विश्वास आहे. चुकीच्या सामाजिक प्रथा नष्ट करण्यासाठी महिलांचे मोठे योगदान असू शकते. अशा शब्दात त्यांनी उपस्थित महिलांची स्तुती केली. डॉ. बाबासाहेबांनी जेव्हा समाज सुधारणेचे काम हाती घेतले होते तेव्हाच त्यांनी पुरुषांबरोबर स्त्रीयानासुद्धा पुढे नेण्याचा निश्चय केला होता.यावरून स्त्रीचे समाजात स्थान किती महत्वाचे आहे ते त्यांनी भारतीय समाजाच्या निदर्शनास आणून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पहिले अध्ययनकर्ते आहेत ज्यांनी भारतीय संरचेत महिलांच्या स्थितीला लिंगाच्या दृष्टीकोनातून समजण्याचा प्रयत्न केला.

त्यांच्या अनेक विचारांपैकी ‘महिला सबलीकरण’ हे एक महत्वाचे विचारमंथनाचे सार होते. महिला उत्थानासाठी व त्यांच्या प्रगतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग एखाद्या योध्यापेक्षा कमी नव्हता. सामाजिक न्याय, सामाजिक ओळख, समान संधी, संवैधानिक स्वातंत्र्याच्या रूपाने महिला सशक्तीकरणात त्यांचे योगदान पुढील अनेक पिढ्यानपिढ्या लक्षात राहील. अशा या महान योद्ध्यास त्यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन.

-प्रा.संजय नामदेवराव चक्रनारायण
मंगरुळपीर जि.वाशिम
मो.9922840131

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!