प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम: येत्या 6 ते 16 एप्रिल या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचा आज 6 एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवनातील सभागृहात शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्य डॉ. छाया कुलाल हया होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष लक्ष्मण राऊत, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांची उपस्थिती होती.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॉ. कुलाल म्हणाल्या, समाजाच्या कल्याणाच्या दृष्टिने सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन 6 ते 16 एप्रिल दरम्यान करण्यात येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समाजावर मोठे ऋण आहे. ते ऋण आपण कधीही फेडु शकत नाही अन्यायाविरुध्द प्रत्येकांने आवाज उठविला पाहिजे. शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा हा डॉ. आंबेडकरांचा मुलमंत्र प्रत्येकांनी आत्मसात केला पाहिजे. येत्या 14 एप्रिल रोजी बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या जिल्हयातील 501 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले. श्री. राऊत म्हणाले, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अनेक योजना आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून या योजनांची माहिती समाजातील लाभार्थ्यांना मिळाली पाहिजे. माहिती मिळाल्यास लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेणे सोयीचे होणार आहे. या लाभामुळे लाभार्थ्यांचे जीवन सुखमय होण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले.
