प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम : जिल्हयातून काही राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच काही जिल्हा मार्ग जातात. मोठया प्रमाणात या रस्त्यांची कामे झाली आहे. त्यामुळे या मार्गाने माल वाहतूक व प्रवाशी वाहतूक वेगाने होत आहे. तसेच दुचाकीस्वार या मार्गाचा उपयोग करीत आहे. या मार्गावर अपघात होणार नाही तसेच जर अपघात झाला तर प्राणहानी होणार नाही याकरीता संबंधित विभागाने योग्य समन्वयातून रस्ता सुरक्षेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.
आज 6 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची सभा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे, सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सैय्यद, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक राकेश जवादे, वाशिम नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिपक मोरे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) राजेंद्र शिंदे, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सोयस्कर व वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उपस्थित होते. श्री. षण्मुगराजन म्हणाले, रस्त्यावरील अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी 108 क्रमांकाची ॲम्बुलन्स ही वेळेत घटनास्थळी पोहोचली पाहिजे.
