अंजनगाव सुर्जी – महेश बुंदे
दर महिन्याला येणारे विज आणि पाण्याचे बिल आम्ही कुठून भरावे असा संतप्त सवाल हजारो दिव्यांग बांधवां समोर निर्माण झाला आहे. आम्ही कसे जगावे असा सवाल दिव्यांगांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.
हाताला काम नाही, रोजगाराचे साधन नाही अशा स्थितीत राज्यातील दिव्यांगापुढे दिवसेंदिवस अनेक गंभीर समस्या निर्माण होत असून हजारो दिव्यांग बांधवांपुढे आम्ही कसे जगावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.विजेचे बिल,पाण्याचे बिल आम्ही कुठून व कसे भरावे असा गंभीर प्रश्न आमच्या पुढे दर महिन्याला निर्माण होत असतो. निराधार योजनेचे जे मानधन मिळते त्यामधून कसेबसे आम्ही बिल भरतो त्यानंतर हाती काहीच शिल्लक राहत नाही.आम्ही कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा रोजगाराचे साधन नाही.
आणि दोन्ही डोळ्यांनी दृष्टिहीन असलेल्या दिव्यांगांच्या समस्या त्याही पेक्षा कठीण आहेत.आमच्यापुढे जीवन कसे जगावे हाच प्रश्न निर्माण झाला असल्याचे स्थानिक शहरातील दोन्ही डोळ्यांनी दृष्टिहीन असलेला एक युवक पुंजाजी राऊत व त्याची पत्नी प्रमिला पुंजाजी राऊत यांनी केला असून आमच्या सर्वच दिव्यांग बांधवांची परिस्थिती अतिशय कठीण असल्याचे सदर दिव्यांग कुटुंबाने सांगितले.शासनाने वीज बिल व पाणी बिल दिव्यांगा करिता माफ केल्यास दिव्यांगांना फार मोठा आधार त्यामुळे होऊ शकतो.
शासनाने आमच्या दिव्यांग बांधवांच्या समस्या कडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी दिव्यांग पुंजाजी राऊत,प्रमिला राऊत, देवेंद्र गुरूवंशी,प्रल्हाद धनोकार, गजानन आवंडकर,गणेश खडेकार, वनिता सुतकर,संगीता राऊत,विकी ताडे,हरिदास कावनपुरे,ज्योति कावनपुरे,हेमंत लवटे,पंचफुला आवंडकर यांनी केली आहे.
दिव्यांगांना विज बिल २०० युनिट व पाण्याच्या बिलात सवलत असावी
शासनाने दिव्यांगांना विज बिल २०० युनिट पर्यंत माफ करावे तसेच पाण्याचे बिलामध्ये ८० टक्के सवलत असावी अशी मागणी स्थानिक अपंग संघटनेकडून होत आहे.
पाणी बिलात अपंगांना कोणतीही सवलत नाही
जीवन प्राधिकरणा कडून जो पाणीपुरवठा ग्राहकांना होतो त्याबाबतचे जे बील ग्राहकांना दिल्या जाते त्या बिलात दिव्यांग असलेल्या ग्राहकांना कोणतीही सवलत शासनाकडून दिल्या जात नसून तसे शासन परिपत्रक नाही.
- विनोद शेंडे (उपविभागीय अभियंता जीवन प्राधिकरण अंजनगाव.) दिव्यांगांना वीज बिलात सवलत नाही महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना जे वीज दिल देयक दिल्या जाते त्यामध्ये दिव्यांग असलेल्या ग्राहकांना वीज बिलाबाबत कोणतीही सवलत नाही.
- संदीप गुजर (अभियंता वीज वितरण कंपनी अंजनगाव सुजी)