प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील पिंपळखुटा संगम येथील अडाण व मडाण या नद्यांच्या संगमस्थळी असलेल्या संत भायजी महाराज तिर्थक्षेत्रावर रविवार ३ एप्रीलपासून १३१ व्या यात्रा उत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. रविवारी सकाळी ६ वाजता ‘रामकृष्ण विठ्ठल हरि नारायण’या अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली असून, हा यात्रा उत्सव शुक्रवार १६ एप्रिल पर्यंत सुरु राहणार आहे.

तिर्थक्षेत्र पिंपळखुंटा संगम येथील संत भायजी महाराजांनी १३१ वर्षा पुर्वी अडाण मडाण नद्यांच्या संगमावर रामनवमी निमीत्त यात्रा उत्सव सुरु केला आहे. दरवर्षी गुढीपाडवा ते हनुमान जयंती पर्यंत साजर्या होणार्या यात्रा महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. मात्र, कोरोना संसर्गामुळे गेल्या दोन वर्षात हा यात्रा उत्सव साजरा होवू शकला नाही. यावर्षी कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे व प्रशासनाने कोरोनाचे सर्व निर्बंध हटविल्यामुळे सदर यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये रविवार ३ एप्रील ते रविवार १० एप्रिल रोजी सकाळी ६ वाजे पर्यंत ‘राम कृष्ण विठ्ठल हरी नारायण’ नामाचा अखंड जयघोष होणार असून रविवार १० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता काकड व मंदीर प्रदक्षिणा,सकाळी ८ वाजता मृती व समाधी पुजन, सकाळी ९ वाजता संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ चांभई व आप्पास्वामी भजनी मंडळ शेंदुरजना अढाव यांचा गायनाचा कार्यक्रम, दुपारी १२ वाजता परमपुज्य पद्माकरजी तर्हाळकर यांच्या उपस्थितीत श्रीराम तर्हाळकर यांच्या सुमधुर वाणी श्रीराम जन्म कथा प्रवचन, त्यानंतर श्रीराम तर्हाळकर अकोला व नरेंद्र हेटे मुंबई, हभप प्रकाश महाराज यांच्या हस्ते श्रीराम, लक्ष्मण व सिता मूर्ती पुजन, दुपारी १ वाजता गोविंद महाराज प्रदक्षिणा व दहीहांडी कार्यक्रम होईल.

आणि दुपारी ३ वाजतापासून हभप प्रकाश महाराज पिंपळखुटा, वैराग्यमूर्ती आकाशपुरी महाराज व हभप संजयनाथ महाराज जाधव अकोला यांच्या उपस्थितीत भव्य महाप्रसादाचे वितरण होणार आहे.
मंगळवार १२ एप्रिल ते शनिवार १६ एप्रिलपर्यंत दररोज सकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत हभप पुंडलीक महाराज गावंडे व लक्ष्मण महाराज फुके चांभई यांच्या मार्गदर्शनाखाली काकड आरती, दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत हभप प्रकाश महाराज यांच्या उपस्थितीत संत भायजी महाराज ग्रंथ पारायण, संध्याकाळी ६ ते ७ हरीपाठ होणार आहे. शनिवार १६ एप्रिल रोजी हनुमान जयंती निमित्त सकाळी ६ वाजता मंदीर प्रदक्षिणा व सकाळी ११ वाजता महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे. तरी वरील कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन गावकरी मंडळी व यात्रा उत्सव समितीने केले आहे.
रविवार 10 एप्रिल रोजी भव्य महाप्रसाद