जुन्नर: मागील बऱ्याच दिवसापासून जुन्नर व आंबेगाव तालुक्यात शेतकऱ्यांचे कृषीपंप, केबल चोर होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले होते. या चोरीची विशिष्ट पध्दत असल्याने त्या टोळीला पिकअप गॅंग असे नाव पडले होते. या गॅंगचा छडा लावणे पुणे ग्रामीण पोलिसांच्या पुढे मोठे आव्हान उभे राहिले होते.
त्यानुसारच नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ६५/२०२२ भादवि कलम ३७९ नुसार ३१ मार्च २०२२ ला एक गुन्हा दाखल झाला होता. यात फिर्यादी ईश्वर दिलीप डेरे(वय-३० रा.डेरेमळा,नारायणगाव ता.जुन्नर, जि.पुणे) यांनी फिर्याद दिली की, ४ मार्च रोजी रात्री १२ ते सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी यांच्या डेरेमळा येथील कॅनॉलवर शेतीला पाणी देण्यासाठी बसवलेली मोटार कोणीतरी अज्ञात इसमानी चोरून नेली आहे. तसेच इतर दोन शेतकऱ्यांच्या देखील मोटारी चोरीला गेल्याची माहिती प्राप्त झाली होती.
वरील दिलेल्या फिर्यादीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर घटनेचा तपास करीत असताना दिनांक २२ मार्च २०२२ रोजी दिनकर फत्तेसिंग.खेबडे(वय-५८,रा.खेबडेमळा नारायणगाव,ता.जुन्नर,जि.पुणे) यांनी फिर्याद दिली की, त्यांची तसेच इतर चार शेतकऱ्यांच्या कॅनॉल जवळ खेबडेमळा येथे शेतीसाठी बसवलेल्या पाण्याच्या मोटारी चोरीला गेल्या आहेत.
अशा एकापाठोपाठ एक मोटार तसेच येडगाव धरण परिसरातील केबल चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण तयार झाले होते. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मार्गदर्शन तसेच सूचना देऊन सदर गुन्ह्याचा लवकरात लवकर तपास करण्या संबंधी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे खेड,जुन्नर विभागात काम करणाऱ्या पथकाने सदर गुन्ह्याचा व आरोपींचा कसून शोध सुरू केला. अनेक भागातील सी.सी.टीव्ही कॅमेरे तपासून तसेच गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदाराच्या मार्फत बातमी मिळाली की इसम शुभम तोत्रे व भूषण पवार हे काही एक कामधंदा करत नसून त्यांचेकडे शेतीला पाणी देण्यासाठी वापरात असलेल्या मोटारी विक्री करण्यासाठी नारायणगाव एस टि स्टॅण्ड येथे येणार असल्याची खात्रीपूर्वक माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन तीन संशयित इसमांना ताब्यात घेतले.
त्यातील शुभम संदिप पवार(वय-२२,रा.पाटेखैरे मळा, नारायणगाव), शुभम सुभाष तोत्रे(वय-१८,रा.मंचर, ता.आंबेगाव,जि.पुणे), विकी संतोष लोखंडे(वय-२०, रा.वैदूवाडी,नारायणगाव, ता.जुन्नर,जि.पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून सदर गुन्ह्यासंबंधी अधिक विचारपूस केली असता भूषण पवार याने सांगितले की,मी तसेच माझे मित्र शुभम तोत्रे, विकी लोखंडे व इतर तीन अल्पवयीन बालके आम्ही मिळून वेगवेगळ्या ठिकाणाहून पाण्याच्या मोटारी तसेच केबल चोरी केल्या आहेत. त्यातील काही मोटारी या नारायणगाव कुकडी कॅनॉल येथे बंद पडलेल्या जुन्या खोल्यांमध्ये लपवून ठेवल्या असून काही मोटारी या ओतूर येथील गुफराण शेख या इसमाला विकल्या आहेत.
वरील प्रमाणे मिळालेल्या माहितीनुसार सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून विविध कंपन्यांच्या एकूण नऊ मोटारी व केबल सह गुन्ह्यात वापरलेली एक पिकअप,एक टाटा इंडिका, एक टाटा इंडिगो अशी तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत. सदर आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढीक कार्यवाही करीत त्यांना नारायणगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
