चाकण: मागील बऱ्याच दिवसापासून चाकण परिसरातील इंग्लिश मिडीयम शाळांच्या अनागोंदी कारभाराला अक्षरशः पालक वर्ग मेटाकुटीला आले आहेत. त्यातच चाकण परिसरातील वाकी बुद्रुक येथील पायस मेमोरियल हायस्कूलमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार सदाशिव बच्चे, रा.राक्षेवाडी यांची दहा वर्षांची मुलगी वाकी बुद्रुक येथील पायस मेमोरियल हायस्कूल या शाळेत इयत्ता ४ थी मध्ये शिक्षण घेत आहे. मागील महिन्याच्या २३ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी पायस शाळेत आली असता, तिने शाळेचा स्कड ड्रेस घातला नसल्याने तिला शाळेतील मुजोर रेखा नामक शिक्षिकेने मुलीच्या हातावर लाकडी पट्टीने जोरात मारहाण केली. त्यात त्या मुलींच्या हाताला गंभीर मार लागला.

ही घटना त्या मुलीने घरी आल्यानंतर आपल्या आईला सांगितली. मुलीच्या हाताला जास्त सूज आली अडल्याने त्या मुलीच्या आईने तिला खेड येथील चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात औषध उपचार करण्यासाठी नेले. त्यात त्या मुलीच्या हाताचा एक्सरे केल्यानंतर हाताला गंभीर दुखापत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्या अनुषंगाने त्या मुलीच्या आईने ही गंभीर बाब शाळा प्रशासन व एक तक्रारी अर्ज चाकण पोलीस ठाण्यात दाखल केला होता.

या घटनेला महिना उलटून गेला तरी पायस शाळेच्या प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची त्या शिक्षिकेवर कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर एक महिना पूर्ण होऊन गेल्या नंतर पालकांनी ३१ मार्च रोजी शाळेच्या प्राचार्य ट्रीझा चाको यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता. त्यांनी उलट झाले ते झाले आता प्रकरण मिटून घ्या असा उपरोक्त सल्ला त्या मुलीच्या आईला दिला. यात विशेष म्हणजे या मुजोर रेखा नामक शिक्षिकेने मुलींना अश्लिल भाषेचाही वापर केल्याचे त्या मुलीच्या आईने माध्यमांशी बोलतांना सांगितले.
