- मधु मंगेश कर्णिक लिखित ‘प्राप्तकाल’ या कादंबरीचा प्रकाशनसोहळा संपन्न
- कादंबरीवरील परिसंवादात वर्तमान सामाजिक-राजकीय वातावरणावर मान्यवरांचे भाष्य
प्रतिनिधी नीरज शेळके
ठाणे :- आधुनिकता आणि परंपरा यांच्यातला संघर्ष-संवाद टिपणारे कथात्म लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या ‘प्राप्तकाल’ या कादंबरीचे प्रकाशन शुक्रवारी, 25 मार्च 2022 रोजी झाले. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे संपन्न झालेल्या या प्रकाशनसोहळ्यात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ-विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘प्राप्तकाल’वरील परिसंवादात राज्यसभा सदस्य व संपादक संजय राऊत, ज्येष्ठ लेखक भारत सासणे, वृत्तनिवेदक मिलिंद भागवत व माध्यम सल्लागार जयु भाटकर यांनी या कादंबरीचे मर्म उलगडून दाखविले.
कोकण मराठी साहित्य परिषद अर्थात ‘कोमसाप’च्या 31 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कोमसाप, आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय आणि मॅजेस्टिक प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्राप्तकाल’च्या प्रकाशनसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, राज्यसभा सदस्य आणि संपादक संजय राऊत, ज्येष्ठ लेखक व 95 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, वृत्तनिवेदक मिलिंद भागवत, माध्यम सल्लागार जयु भाटकर, शारदा एज्युकेशन सोसायटीचे विलास ठुसे, प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, जेपी उद्योगसमूहाचे जयप्रकाश मौर्य आदी मान्यवरांच्या हस्ते ‘प्राप्तकाल’ या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मधु मंगेश कर्णिक यांच्या जीवनावरील नरेंद्र बेडेकर निर्मित चरित्रपर माहितीपट प्रदर्शित करण्यात आला, तसेच आनंद विश्व गुरुकुलतर्फे कर्णिक यांच्या तब्बल सात दशकांच्या साहित्यिक-सामाजिक योगदानाविषयी मानपत्र देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांनी कर्णिक यांच्या आजवरच्या वाटचालीचा आणि कार्याचा समर्पक आढावा घेतला, तर मॅजेस्टिक प्रकाशनाचे अशोक कोठावळे यांनी कर्णिक यांच्याबरोबरच्या साहित्यिक आणि कौटुंबिक नात्याविषयीच्या तसेच ‘प्राप्तकाल’ या कादंबरीच्या निर्मितीविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.
या प्रकाशन सोहळ्यात ‘प्राप्तकाल’वरील परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले होते. डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार संजीव लाटकर यांनी खासदार संजय राऊत, ज्येष्ठ लेखक भारत सासणे, वृत्तनिवेदक मिलिंद भागवत, माध्यम सल्लागार जयु भाटकर यांच्याशी ‘प्राप्तकाल’संदर्भात संवाद साधला. मानवी व्यवहारांचे अचूक निरीक्षण आणि सामाजिक-राजकीय स्थित्यंतरांची जाणीव प्रतिबिंबित करणाऱ्या कादंबऱ्यांतून समाजवास्तवाचे विविध कंगोरे दाखवून देणारे मधु मंगेश कर्णिक यांची ‘प्राप्तकाल’ ही कादंबरी वर्तमान वास्तवाचे भान देणारी आहे, अशा शब्दांत मान्यवरांनी या कादंबरीचे प्रकाशनसोहळ्यात स्वागत केले.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात होऊ लागलेला मध्यमवर्गाचा मूल्यऱ्हास अधोरेखित करणाऱ्या ‘संधिकाल’ या कर्णिक यांच्या कादंबरीचा संदर्भ परिसंवादातील वक्त्यांनी दिलाच; पण एकविसाव्या शतकात घडणारी, वर्तमानकालीन विविध संदर्भांचा अंतर्भाव असणारी, भविष्यातील दुर्घटिताचे सूचन करणारी ‘प्राप्तकाल’ ही कादंबरी कवी केशवसुतांच्या ‘प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा’ या काव्यमय सूत्राची आठवण करून देणारी आणि आशावाद पेरणारी असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.
यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘प्राप्तकाल’ या कादंबरीत आजच्या अस्वस्थ महाराष्ट्राचे प्रतिबिंब उमटले आहे. कोकणातल्या माणसाचा भवतालाकडे पाहण्याचा सहजभाव कर्णिक यांच्याकडे आहे आणि या कादंबरीत तो अधिक नेमकेपणाने आलेला आहे. डोळे-कान उघडे असणारा कोकणी आणि महाराष्ट्रीय माणूस जे घडते आहे त्याविषयी व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही.
तेच या कादंबरीतूनही जाणवते, असे सांगत राऊत यांनी आपल्या खास शैलीत सध्याच्या राजकारणावर मिश्किल टिप्पणी केलीच, शिवाय आपली लोकशाही टिकवण्याची जबाबदारी मध्यमवर्गावर असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तर ज्येष्ठ लेखक भारत सासणे यांनी ‘प्राप्तकाल’च्या लेखनशैलीविषयी मत मांडत ही आधुनिकोत्तर काळाची कादंबरी असल्याने ती खऱ्या अर्थाने उद्याची, काळाच्या पुढची कादंबरी असल्याचे प्रतिपादन केले.
वृत्तनिवेदक मिलिंद भागवत यांनी आजच्या राजकीय वातावरणातील उबग आणणाऱ्या प्रकारांमुळे तरुणवर्ग राजकारणापासून लांब राहणे पसंत करतो, हे वास्तव ‘प्राप्तकाल’मध्ये नेमकेपणाने आल्याचे सांगत कोकणी माणसाला आपल्या गावाची आठवण करून देणारी ही कादंबरी असल्याची भावना व्यक्त केली. माध्यम सल्लागार जयु भाटकर यांनीदेखील आजच्या कोकणातील निसर्गाच्या व राजकारणाच्या ऱ्हासाचे क्रूर वास्तव ‘प्राप्तकाल’मध्ये चित्रित झाल्याचे सांगत या कादंबरीतील मर्मस्थळे उलगडून दाखविणारे अनेक दाखले दिले.
हिंदूंची नेमकी अडचण काय आहे?