अमरावती – महेश बुंदे
शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळा संपूर्ण क्षमतेने शंभर टक्के उपस्थितीसह सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. यात शनिवारी पूर्णवेळ आणि रविवारी ऐच्छिक स्वरुपात शाळा सुरु ठेवता येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, उन्हाळ्यातील वाढते तापमान, प्रचंड उकाडा व शाळेतील असुविधा लक्षात घेता या आदेशाबाबत फेरविचार करावा, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस विजय कोंबे, राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण संचालक दिनकर टेमकर, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
कोरोना काळातील झालेले नुकसान भरून काढण्यासाठी पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग एप्रिल महिन्यात पूर्णवेळ सुरु ठेवण्याचे आदेश दिले.आहेत. तसेच या विद्यार्थ्यांची परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्यात याव्यात, अशा सूचना दिल्या आहेत. परंतू, कोरोना काळात शिक्षकांनी प्रतिबंधात्मक कर्तव्य पार पाडत विद्यार्थ्याच्या शिक्षणाकडे जबाबदारीने लक्ष दिले आहे. स्वतःहून अनेकविविध उपक्रमांच्या आधारे शिक्षण सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला.
दरवर्षी मराठवाडा, खान्देश, विदर्भातील उष्णता व पाण्याची टंचाई लक्षात घेता मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरविल्या जातात.मराठवाडा, विदर्भातील बहुतांश शाळा या पत्र्याच्या असल्याने उष्णता वाढते. दिवसभर भारनियमन असल्यामुळे पंखा बंदमुळे विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड उकाड्याच्या विपरीत परिस्थितीमुळे जीव कासावीस करणारे वातावरण असते. आरोग्याच्या दृष्टीकोणातून दिवसभर शाळा सुरु ठेवणे योग्य ठरणारे नाही. त्यामुळे सकाळच्या सत्रात शाळांची वेळ कायम करावी, अशी मागणी शिक्षक समितीने केली आहे.
प्रशिक्षणासह इतर कामे थांबवा
माध्यमिक विभागाशी संबंध नसताना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना परीरक्षकाच्या मदतीसाठी नियुक्त केले जाते. परीक्षेच्या काळात हे अध्ययन अध्यापनावर फरक पडतो. तसेच शिक्षकांना वर्षभर प्रशिक्षण न देता केवळ मार्च मध्ये प्रशिक्षण देणे सुरु आहे. यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कंत्राटी विषय साधन व्यक्ती, अन्य पर्यवेक्षकीय घटक असताना प्रत्येक केंद्रातून शिक्षकांना घेतले जाते. त्यामुळे दैनंदिन अध्यापनाचे काम प्रभावित होते. म्हणून प्रशिक्षणे थांबवावीत
प्रतिक्रिया
सकाळ सत्रात न भरता पूर्णवेळ शाळा भराविण्याचे शासनचे आदेश आहेत. सध्यस्थितीत उन्हाची तीव्रता, शाळेचे पत्र्याचे छत, ग्रामीण भागातील भारनियमन,पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई लक्षात घेता शाळा सकाळ सत्रातच भराव्यात. पूर्ण तासिका होतील असे वेळापत्रक प्रशासनाने द्यावे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.
- राजेश सावरकर, राज्य प्रसिध्दीप्रमुख, शिक्षक समिती