हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या ऑडिटोरियमचे सोमेश्वर पुसतकर सभागृह असे नामकरण
जाणता राजा वेलफेअर सोसायटीतर्फे अनाथ भावंडांना ५० हजार रुपयांची मदत
अमरावती – ओम मोरे :-
येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या ऑडिटोरियमचे आज स्व. सोमेश्वर पुसतकर सभागृह असे नामकरण करण्यात आले. एका अनौपचारिक कार्यक्रमात पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या हस्ते व माजी खासदार अनंतराव गुढे, माजी महापौर विलास इंगोले, अमरावती महापालिकेचे सभागृह नेते तुषार भारतीय, विरोधी पक्षनेता बबलु शेखावत, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दिनेश बूब, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सचिव डॉ.माधुरी चेंडके, अॅड.चंदूभाऊ कलोती, नगरसेवक प्रा.प्रशांत वानखडे, राजाभाऊ मोरे, वृषाली पुसतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भावपूर्ण वातावरणात हा नामकरण सोहळा संपन्न झाला.

शिवसेनेचे दिवंगत नेते सोमेश्वर पुसतकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी २ ऑगस्ट रोजी झालेल्या एका कार्यक्रमात हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या ऑडिटोरियमला सोमेश्वर पुसतकर यांचे नाव देण्याची घोषणा प्रभाकरराव वैद्य यांनी केली होती. आज २८ ऑक्टोबरला पुसतकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा नामकरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. नुतनीकरण करण्यात आलेल्या सभागृहातील छोटेखानी कार्यक्रमात पुसतकर यांनी स्थापन केलेल्या जाणता राजा वेलफेअर सोसायटीतर्फे ऋषभ व नेहा चव्हाण या अनाथ भावंडांना ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली.
या प्रसंगी बोलताना प्रभाकरराव वैद्य यांनी सोमेश्वर पुसतकर यांच्या सामाजिक कार्याची उजळणी करताना पुसतकर यांनी दूरदृष्टी, मेहनत व चिकाटीने अनेक महत्वपूर्ण कामे तडीस नेल्याचे सांगितले. त्यांच्या अकल्पित जाण्याने अमरावती शहराचे मोठे नुकसान झाले आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सोमेश्वर यांनी सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात जे मोठे काम केले ते काम पुढे सुरु राहावे यासाठी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अधिकाधिक मदत देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. माजी खासदार अनंतराव गुढे यांनी याप्रसंगी सोमेश्वर पुसतकर यांच्या स्मृतीला उजाळा देताना हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सभागृहाला त्यांचे नाव दिल्याने त्यांच्या कर्तृत्वाची सतत उजळणी होत राहील व भावी पिढ्यांना त्यातून प्रेरणा मिळेल असे सांगितले. विलास इंगोले यांनी याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करतांना सोमेश्वर पुसतकर चालवत असलेले सर्व समाजपयोगी उपक्रम चालू ठेवण्यासाठी आझाद हिंद गणेशोत्सव मंडळ व व्यक्तिश: मी सर्वोतपरी मदत करेल असे सांगितले .
