नाचोना येथील अभ्यंकर कुटुंबात विवाह सोहळा संपन्न होण्याच्या तीन दिवस अगोदर घरपोच मिळाली अन्नधान्याची किराणा किट
दर्यापूर – महेश बुंदे
जन सेवा हीच खरी ईश्वर सेवा हे ब्रिद लक्षात घेऊन दर्यापूर तालुक्यासह इतर क्षेत्रात देवदूत म्हणून ओळखले जाणारे गोर गरिबांचे कैवारी अशी समाजसेवक रामूसेठ मालपाणी यांची जनसामान्यात प्रतिमा आहे. गरिबांच्या मदतीला तत्पर असणारे मालपाणी यांनी नाचोना येथील अभ्यंकर कुटूंबाची समस्या लक्षात घेऊन येत्या २८ मार्चला दीक्षा शंकरराव अभ्यंकर या मुलीचा विवाह सोहळा संपन्न होण्याच्या तीन दिवस अगोदर (२५ मार्च रोजी) अन्न-धान्यांची किराणा किट स्वखर्चातून देऊन उपलब्ध करून ‘त्या’ कुटूंबासाठी देवदूत ठरले. कुटूंबात तिचे वडील अपंग असून भाऊ संघदिप सोबतीला आहे. या प्रसंगी इंजि. नितेश वानखडे, पत्रकार शशांक देशपांडे, महेश बुंदे, नंदू सोमानी, राजेश उगले, पप्पू मिर्झा, नंदू सोमानी, नामदेव उटाळे, अनिल बागळे, निलेश वानखडे, सरपंच विजय अढाऊ, माजी सरपंच पुंडलीक पतींगे, सदस्य नंदकिशोर राऊत, रमेश काकड, शंकर काकड आदी उपस्थित होते.
सामाजिक बांधीलकीतून एकत्र आलेला “कौसल्यादेवी निवारा ट्रस्ट” हा सातत्याने गरीब, गरजू लोकांसाठी विविध उपक्रम राबवत समाजभान जोपासण्याचे काम करत आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो व समाजातील गरीब, गरजू, दुर्लक्षित घटकांसाठी आपल्या कमाईतील काही भाग किंवा काही वेळ देता यावा, अनेक जण अक्षरशः धडपडत असतात. त्यातीलच एक हरहुन्नरी व्यक्ती म्हणजे समाजसेवक रामूसेठ मालपाणी. पेशाने व्यावसायिक असलेल्या रामूसेठ मालपाणी यांना समाजकार्याची भारी हौस नव्हे तर व्यसनच लागले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ‘कौसल्यादेवी निवारा ट्रस्ट’ स्थापन करून विविध लोकोपयोगी कामांना सुरवात केली. त्यांचेबरोबर सामाजिक उपक्रमांची आवड असलेले त्यांचे अनेक सहकारी जोडले गेले आहेत. दुसऱ्याला देण्यात जो आनंद मिळतो तो इतर कशातही नाही या भावनेतून या सोशल ट्रस्टचे नामकरण “कौसल्यादेवी निवारा ट्रस्ट” असे करण्यात आले आहे.
प्रतिक्रिया –
“वास्ताविक स्वार्थ व वैयक्तिक हितासाठी झगडणाऱ्या आजच्या दुनियेत सामाजिक बांधिलकी व माणुसकी लोप पावत चालली आहे. प्रत्येक जण इथे फक्त स्वतःपुरताच विचार करतो. यामुळे गरीब श्रीमंतदरी समाजात वाढत चालली आहे. ही दरी कमी करायची असेल तर समाजातील गरीब, दुर्बल व वंचित घटकांचा विचार कुणीतरी करायला हवा. त्यांच्या अपेक्षा फार नसल्या तरी जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची मदत त्यांना मिळायला हवी. यासाठी समाजातील धनाढ्य, उद्योगपती, मोठमोठ्या सामाजिक संस्था यांचेमार्फत जाणीवपूर्वक प्रयत्न होणे आवश्यक आहेच पण समाजभान जपणाऱ्या संवेदनशील नागरिकांचा सहभाग देखील मोठा बदल घडवू शकतो.”
शशांक देशपांडे – (पत्रकार, दर्यापूर)