जाधव परिवाने समाजाला नवा आदर्श दिला- सत्यपाल महाराज,स्व.ओंकारराव(बाप्पू) व स्व.इंदिराबाई जाधव यांचा प्रथम पुण्यस्मरण संपन्न
दर्यापूर – महेश बुंदे
समाजातील दानशूर व्यक्तींनी नवीन मंदिर उभारणी पेक्षा आपल्या गावच्या शाळाचा जीर्णोद्धार महत्वाचा करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध करुन द्यावी,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले,ते तोंगलाबाद येथील माजी सरपंच स्व.ओंकारराव(बाप्पू)जाधव व स्व.इंदिराबाई जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त आयोजित श्री पांडुरंग हरी आश्रम सुविधा लोकार्पण व कृतज्ञता सोहळा प्रसंगी बोलत होते.
यावेळी बच्चूभाऊ कडू म्हणाले की,आज धार्मिक कार्यक्रम सोबतच शिक्षण, आरोग्य,कृषी क्षेत्राचा विकास करणे महत्वाचे आहे.नागरिकांचे आरोग्य चांगले असेल व सर्वाना दर्जेदार शिक्षण व कृषी क्षेत्राला प्रोत्साहन दिले तर देशाची खरी प्रगती होईल असे ते याप्रसंगी बोलतांना म्हणाले. तालुक्यातील तोंगलाबाद-सौंदळी परिसरात असणाऱ्या श्री पांडुरंग हरी आश्रम येथे स्व.ओंकारराव(बाप्पू)जाधव व स्व.इंदिराबाई जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त श्री पांडुरंग हरी आश्रम सुविधा लोकार्पण व कृतज्ञता सोहळा आणि सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचा ‘सत्यवानी’हा समाजप्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी सत्यपाल महाराज म्हणाले की, आई-वडील हेच खरं आपले देव असतात, आणि त्याची आयुष्यभर सेवा करून त्याच्या पुण्यास्मरण निमित्ताने समाजाला दिशा देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करून जाधव परिवाने समाजाला नवा आदर्श दिला घालून दिला आहे,असे ते म्हणाले. या कार्यक्रमा निमित्त सकाळी श्रद्ध विधी पूजा व भोजन संपन्न झाले.यावेळी विधानपरिषद आमदार अरूणराव अडसड यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी राज्यमंत्री ना.बच्चूभाऊ कडू,माजी आमदार तुकारामभाऊ बिडकर,सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज,जिल्हा परिषद आरोग्य व वित्त सभापती बाळासाहेब हिंगणीकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकाळे,सुनिल पाटील गावंडे,क्रीडा उपसंचालक विजय संतान,जिल्हाक्रीडा अधिकारी चंद्रकांत उपलवाल,सेवानिवृत्त शिक्षक मधुकरराव अंबरते,प्रा.गिरीधर बोरखडे,निळकंठ टापरे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रम दरम्यान तोंगलाबाद येथील जाधव परिवारासोबत ऋणानुबंध असणाऱ्या व्यक्तीचा यावेळी पाहुण्याच्या हस्ते सन्मान झाला. या प्रसंगी स्व.इंदिराबाई जाधव यांच्या स्मृती निमित्ताने ना.बच्चूभाऊ कडू यांच्या विधवा महिलेसाठी काम करणाऱ्या वीर बाजीप्रभू संस्थेला ५० हजार रुपयांचा धनादेश जाधव परिवाराच्या वतीने देण्यात आला. हाच धनादेश व स्वतःची आई इंदिराबाई बाबाराव कडू यांच्या स्मृती निमित्ताने त्यानी एक लक्ष रुपयांचा धनादेश तोंगलाबाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक सदानंद जाधव यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय जिल्हाक्रीडा अधिकारी गणेशराव जाधव यांनी दिला आणि संचलन प्रा. डॉ. देवलाल आठवले व प्रा.निलेश जळमकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री पांडुरंग हरी आश्रम संचालक अरुणराव जाधव व जाधव परिवार आणि मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
कृतज्ञता सोहळ्याने पाणावले सत्कार मूर्तीचे डोळे……
तोंगलाबाद येथील स्व. ओंकारराव बाप्पू व स्व.इंदिरा या जाधव दाम्पत्य यांनी अतिशय मेहनतीने आपला संसार उभा केला,त्याना पाच मुले व व एक मुलगी आहे.या मुलांमधील अरुणराव व प्रकाश हे दोन पोलीस तर सदानंद जाधव राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि गणेशराव जाधव जिल्हाक्रीडा अधिकारी तर गजाननराव शेतकरी म्हणून कार्यरत आहेत.तसेच नातू सुद्धा विविध पदावर कार्यरत आहेत.अशा या जाधव परिवाराला आजपर्यंत सहकार्य करणारे अनेकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.त्यामुळे या कृतज्ञता सोहळ्याने सत्कार मूर्तीचे डोळे पाणावले होते.

शालेय शिक्षण राज्यमंत्री यांनी दिला जिल्हा परिषद शाळेला एक लक्ष रुपयांचा धनादेश……