प्रतिनिधी आर एन माळी
शिवयोद्धा प्रतिष्ठाण, रुपीनगर यांनी सालाबादप्रमाणे याहीवर्षी आदर्श अशी शिवजयंती साजरी केली. नेहमीप्रमाणे डॉल्बी-डीजे यांना फाटा देऊन पहाटेच्या मंगलमय वातावरणात पारंपरिक पद्धतीने शिवरायांची पालखी मिरवणूक रुपीनगर मध्ये काढण्यात आली. तत्पूर्वी प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांनी किल्ले शिवनेरीवरून शिवज्योत आणली. ढोलताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीत युवक व महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राची लोककला असलेले भारुड सादर करण्यात आले. राष्ट्रीय भारुडकार हमीद अमीन सय्यद यांनी शिवचरणी भारुडसेवा सादर केली. लोप पावत चाललेली भारुड कला पाहून उपस्थित प्रेक्षक आणि शिवभक्त यांनी कार्यक्रमाला दाद दिली.
प्रतिष्ठाण चे अध्यक्ष श्री. अमोल तुकाराम भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी अशाच प्रकारे एक आदर्श शिवजयंती सोहळा साजरा करण्यात येतो. “छत्रपती शिवरायांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. त्यांचा जन्मोत्सव साजरा करण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. या कार्यक्रमातून शिवरायांचे विचार व इतिहास यांचा समाजामध्ये प्रसार व्हावा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. ” असे अध्यक्ष अमोल तुकाराम भालेकर यांनी नमूद केल.
