प्रतिनिधी सुनील बटवाल
चिंबळी दि २(वार्ताहर) मोशी गावचे ग्रामदैवत श्री.नागेश्वर महाराजांचा भंडारा उत्सव परंपरेने शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी बुधवार (दि.२ )रोजी उत्साहात संपन्न झाला.शेकडो भाविकांनी यावेळी भंडाऱ्यात शेकभाजी – बुंदी या परंपरागत महाप्रसादाचा लाभ घेतला.आमराई मैदानात भाविकांच्या लांबच लांब बसलेल्या पंगती विलोभनीय दिसून येत होत्या.

महाशिवरात्री नंतर मोशी यात्रेस सुरुवात होते.सर्वप्रथम भंडारा उत्सव,उरूस, लिलाव,आखाडा असे स्वरूप असते मंगळवार पासूनच भाविकांनी मंदिर परिसर व आमराईतील नंदादीप परिसरात गर्दी केली होती.यात्रा कालावधी मध्ये गावातील शिवाजी महाराज प्रवेशद्वार,मंदिरे,शाळा इमारती वरील करण्यात आलेली विद्युत रोषणाई लक्षवेधी ठरत होती.शहर परिसर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ दरवर्षी भंडारा उत्सवामध्ये सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. भंडाऱ्याच्या दिवशी ग्रामस्थांकडून बुंदी व शेकभाजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

आमराईमध्ये होम,हवन,महापूजा,आरती झाल्यानंतर दर्शनासाठी भाविक भक्तांची वर्दळ सुरु होती.सायंकाळ नंतर भाविकांच्या पंगती बसून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.पोलिसांच्या वतीने यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.आधुनिकिकरणाच्या रेट्यात देखील मोशीकरांनी आपली परंपरा जपली असून भंडारा उत्सवाला भाविकांचा प्रतिसाद वाढताना दिसून येत आहे.भंडारा उत्सवानंतर होणारा लिलाव,यात्रा,आखाडा याला देखील भाविकांचा उत्तम प्रतिसाद लाभेल असे चित्र आहे.

सहा ट्रॉली बुंदी अन चाळीस मोठी पातेली शेकभाजी
मोशीच्या नागेश्वर महाराज्यांच्या भंडाऱ्याची परंपरा खूप जुनी असून जिल्ह्याच्या अनेक भागातून भाविक या भंडाऱ्यात शेकभाजी व बुंदी प्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात.यावेळी या भंडाऱ्यात भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता जवळपास सहा ट्रॅक्टर ट्रॉली भरतील इतकी बुंदी तयार करण्यात आली होती तर चाळीस मोठी पातेली भरतील एवढी शेकभाजी तयार करण्यात आली होती.
