प्रतिनिधी सुनील बटवाल
पुणे वार्ता :- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीने पुनीत झालेल्या तीर्थक्षेत्र आळंदी देवाची ते श्रीपतीबाबा यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या क्षेत्र महाळुंगे इंगळे या गावांना जोडणारी पीएमपीएलची बससेवा तातडीने सुरु करावी अशी मागणी जोर धरू लागली असून या मार्गावर येणाऱ्या आळंदी,केळगाव,चिंबळी,कुरुळी,मुऱ्हेवस्ती,डोंगरेवस्ती,मोई,निघोजे,महाळुंगे आदी गावातून बससेवा सुरु व्हावी अशी होत आहे.तीर्थक्षेत्राबरोबरच हा भाग मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्रात येत असून कामगार वर्ग याभागात मोठ्या प्रमाणात राहण्यास आहे.
त्यांनाही सुविधेचा लाभ होऊ शकतो,व्यापारी वर्गा बरोबरच शालेय विद्यार्थी देखील या भागात मोठ्या सांख्येने आहेत.केळगाव – चिंबळीच्या मध्ये अध्यात्मिक आश्रम असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात साधक येत असतात त्यानंही प्रवाशी वाहने नसल्याने गैरसोयीचा सामना करावा लागतो.इंद्रायणी नदीच्या उत्तरेकडील गावे एक बससेवेने जोडली जावीत ही अनेक वर्षांची स्थानिकांची मागणी आहे.सद्या नव्हे नव्हे मार्गावर पीएमपीएलची बससेवा सुरु करण्यात आली आहे त्यात अवघ्या वीस किलोमीटर अंतराची सदरच्या मार्गावरील बससेवा पीएमपीएलचे उत्पन्न वाढवणारी ठरणार आहे.
सदरच्या मार्गावर मोठ्याप्रमाणात रहदारी वाढली असून गृहप्रकल्प उभे रहात आहेत या नागरिकांसाठी सार्वजनिक प्रवाशी वाहतूक सुविधा उपलब्ध नसल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.यामुळे खाजगी प्रवाशी वाहने प्रवाशांची आर्थिक लूट करत असून त्याचे नाहक बळी पडण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.शैक्षणिक दृष्टया या भागात विविध शाळा अलीकडच्या काळात सुरु झाल्याअसून त्यांनाही या बससेवेन जोडले जाणार आहे यामुळे विद्यार्थ्यांना सार्वजनिक वाहतुकीचा प्रर्याय उपलब्ध होणार आहे.
आळंदीला सदरील गावांना जोडणारी एकही बससेवा अद्याप नसून चाकणला जाण्यासाठी देखील बसउपलब्ध नसल्याने आळंदीतील भाविकांना नाशिक महामार्गाला येण्यासाठी मोशीला वळसा घालून यावे लागते या अशा अनेक कारणांमुळे येथील नागरिकांची बससेवा सुरु करण्याबाबत आग्रहाची मागणी होत आहे. पीएमपीएल प्रशासनाने सदरील मागणीचा तातडीने विचार करावा अशी अपेक्षा आता या सात गावातील नागरिक व्यक्त करत आहेत. सदर गावांमधून जाणारे रस्ते आता दर्जेदार व प्रशस्त झाले आहेत.पूर्वी रस्त्या अभावी देखील बससेवा सुरू होण्यास टाळाटाळ होत होती.आता तोही प्रश्न राहिला नसल्याचे दिसून येत आहे.
प्रतिक्रिया : –
१ ) कित्येक वर्षांच्या मागणीला अद्याप मूर्त रूप आलेले नाही.अगोदर पीएमपीएल पुण्यापासून चाळीस किलोमीटर अंतराचा आणि उत्पनाचे कारण देत सुविधा सुरु करत नव्हती.आता यात भरपूर बदल झाले असून आता तरी येथील मागणीचा विचार करावा यासाठी आम्ही सर्व गावे एकमुखाने नव्याने प्रयत्न करणार आहोत.
- विलास कातोरे, माजी सभापती, बाजार समिती खेड
२ ) माउलीच्या आणि श्रीपतीबाबांच्या गावांना जोडणारी,विद्यार्थी,कामगार,व्यापारी आणि स्थानिक नागरिकांना लाभदायी ठरणारी सदरील मार्गावरील बससेवा तातडीने सुरु करणे गरजेचे आहे.या भागातील नागरिकांना नाशिक महामार्गावरती येण्यासाठी दोन ते तीन किमीचा पायी प्रवास करावा लागतो त्यांची प्रचंड गैरसोय होते यासाठी प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.यासाठी सर्व गावे तातडीने प्रयत्न करू.
- पांडुरंग बनकर,संचालक,बाजार समिती,खेड
३ ) माउलींच्या दर्शनासाठी विविध बाजूनी भाविक आळंदीत येत असतात मात्र चिंबळी फाटा,कुरुळीकडून येणाऱ्या भाविकांना प्रवासाची सुविधा उपलब्ध नसते यामुळे त्यांची अनेक वर्षांपासून गैरसोय होत आहे.सातही गावांची बससेवा सुरु होण्याची मागणी रास्त असून त्यांच्या मागणीत आम्ही आळंदीकर सहभागी आहोत वेळेला योग्य ती प्रशासकीय मदतीसाठी सोबत येऊ.
वैजयंता उमरगेकर,नगराध्यक्षा, आळंदी देवाची
४) निघोजे,मोई आदी भागाने अनेक वर्षे प्रवासासाठी वनवास भोगल्याची परस्थिती आहे कित्येक किलोमीटर येथील नागरिक चालत जातात त्यांच्यासाठी बससेवा सुरु होणे खूप गरजेचे असून यासाठी कागदोपत्री हालचाली आम्ही सुरु करूच पीएमपीएलने देखील सहानुभूतीने याचा विचार करायला हवा. –
आशिष येळवंडे, अध्यक्ष,सरपंच परिषद.