स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- काल देशभर शासनाच्या आरोग्य विभागाकडून “दो बुंद जिंदगी की”या अभियानाअंतर्गत पल्स पोलिओ मोहीम 0ते 5 वयोगटातील लहान मुलांना लसीकरण करण्यात आले. लसीकरण मोहीम देशात सगळीकडे राबविण्यात आली. शेलपिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून देखील पल्स पोलिओ मोहीम ग्रामीण भागात गावोगावी राबवण्यात आली. परंतु आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.इंदिरा पारखे यांनी गावात बाहेरून आलेले कामगार, ऊसतोड मजुरांच्या मुलांना शेताच्या बांधावर जाऊन लसीकरण केल्याने एक चर्चेचा विषय ठरल्या आहे.

खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला अनेक नामांकने प्राप्त झाली आहेत.येथील आरोग्य केंद्रात गरीब,गरजू सामान्य नागरिकांना योग्य उपचार व शासनाच्या योजनाचा लाभ नागरिकांना मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना याचा फायदा होऊन एक केंद्राने लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.काल देशभरात आरोग्य विभागाने पल्स पोलिओ मोहीम ग्रामीण रुग्णालय, व प्राथमिक आरोग्य केंद्राकडून शहरात व ग्रामीण भागात राबवली.देशातील अनेक 0 ते 5 वयोगटातील लहान बालकांना यावेळी पल्स पोलिओचे डोस देण्यात आले.शेलपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडून लसीकरण मोहिम आशा वर्कर यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील 19 गावामध्ये राबविण्यात आली.

काल दिवसभरात प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत 7018 बालकांना पल्स पोलिओ डोस देण्यात आले.मात्र बाहेरून गावात आलेल्या कामगार वर्ग, व ऊसतोड मजुरांच्या लहान मुलांना केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.इंदिरा पारखे यांनी स्व:ता शेताच्या बांधावर जाऊन लसीकरण केले. तसेच त्यांच्या सहकारी आशा वर्कर यांनी संध्याकाळी घरी परतून आलेल्या मजुरांच्या लहान मुलांना राहत असलेल्या पाल्यावर जाऊन पल्स पोलिओ डोस दिले.

त्यामुळे शेताच्या बांधावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्व:ता भेट देऊन लसीकरण केल्याने नागरिकांकडुन कौतुक केले जात आहे.अधिकारी नेहमी आपल्या कर्मचारी यांना कामाला लावून कामे करून घेत असतात. परंतु अशाप्रकारे अधिकारी स्व: ता बाहेर इच्छितस्थळी जाऊन कामे जबाबदारीने करून घेऊ लागले तर.. शासनाच्या योजना ह्या ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांपर्यंत पोचण्यास वेळ लागणार नाही…हे नक्की.

