अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल 17 घरफोड्या करणारी टोळी जेरबंद करण्यात अहमदनगर पोलिसांना यश

अहमदनगर वार्ता :- नगर जिल्ह्यात श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, नगर तालुका, पाथर्डी, शेवगाव व राहुरी परिसरामध्ये 17 ठिकाणी चोरी व घरफोडी करणारी बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद करण्यात नगर पोलिसांना यश आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून चार जणांना अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल 42 तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व तीन मोटार सायकल असा एकूण 23 लाख 52 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. राम बाजीराव चव्हाण (वय 20, रा. आष्टी, जिल्हा बीड), तुषार हबाजी भोसले (रा. पिंपरखेड, ता. आष्टी, जि. बीड), प्रविण उर्फ भाज्या हबाजी भोसले, विनाद हबाजी भोसले (दोन्ही रा. पिंपरखेड, ता. आष्टी, जिल्हा बीड) अशी आरोपींची नावे आहेत.

दोन दिवसांपूर्वी चास जवळील घुगार्डेवस्ती येथे चोरट्यांनी घरफोडी करुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सव्वादोन लाखांचा ऐवज चोरुन नेला होता. तसेच यापूर्वीही जिल्ह्यात श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, नगर तालुका, पाथर्डी, शेवगांव व राहुरी परिसरामध्ये अशा प्रकारचे गुन्हे घडले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते.

सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर तसेच यापुर्वीही श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, नगर तालुका, पाथर्डी, शेवगांव, व राहुरी परिसरामध्ये अशा प्रकारचे जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे घडलेले असल्याने मा. पोलीस अधिक्षक सो, अहमदनगर यांचे आदेशाने श्री. अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी गुन्ह्याचे समातंर तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक नेमून तपास करुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या.

सदर नमूद सुचना प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि /सोमनाथ दिवटे, सपोनि/गणेश इंगळे, पोसई/सोपान गोरे, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, विजय वेटेकर, बबन मखरे, संदीप घोडके, संदीप पवार, विश्वास बेरड, भाऊसाहेब कुरूंद, देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, सचिन आडबल, संदीप चव्हाण, विजय ठोंबरे, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, लक्ष्मण खोकले, विशाल दळवी, पोकों/शिवाजी ढाकणे, रविंद्र घुंगासे, योगेश सातपुते, जांलिदर माने, रोहित मिसाळ, राहुल सोळुंके, आकाश काळे, सागर ससाणे, मयुर गायकवाड, रणजित जाधव, मच्छिद्र बडे, मेघराज कोल्हे, विनोद मासाळकर, चापोहेकॉ/संभाजी कोतकर, बबन बेरड व चंद्रकांत कुसळकर असे अधिकारी व अंमलदार हे गुन्ह्याचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती.

वरील नमुद हा गुन्हा आष्टी येथील सराईत गुन्हेगार राम बाजीराव चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी केला आहे. तसेच राम चव्हाण व त्याचे साथीदार हे चोरलेल्या सोन्याच्या दागिन्यांची विल्हेवाट लावण्यासाठी नगर येथे येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.

त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी नगर जामखेड रोड येथील आठवड घाट येथे सापळा लावला. संशयित आल्यावर त्यांना थांबण्याचा इशारा करताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकाने दोन मोटार सायकलवरील चार संशयीतांचा पाठलाग करत त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. तर आणखी एका मोटार सायकलवरील दोनजण मोटारसायकल तेथेच टाकून घाटामध्ये पळून गेले.

आरोपींकडून राणीहार, गंठण, मणीमंगळसूत्र, कानातील झुंबर, अंगठ्या, चैन, टॉप्स, नेकलेस, डोरले, कानातील वेल, बोरमाळ बांगड्या असे एकूण 42 तोळे वजनाचे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने, 39 हजार 500 रुपये रोख रक्कम व तीन मोटार सायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मागील सुमारे 2-3 महिन्यात नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, नगर तालुका, शेवगाव, पाथर्डी, व राहुरी या ठिकाणी चोरी व घरफोडी करुन दागिने व रोख रक्कम चोरी केल्याचे व दागिने हे मोडण्यासाठी जात असल्याची कबुली आरोपींनी दिली. जिल्ह्यात शेवगाव, पाथर्डी, राहुरी, श्रीगोंदा, जामखेड, नगर तालुका आदी पोलीस ठाण्यात 17 ठिकाणी गुन्हे दाखल असून हे गुन्हे या आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी प्रविण उर्फ भाज्या हबाजी भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध दरोडा, जबरी चोरीचे गुन्हे आष्टी पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

फरार आरोपींचा शोध सुरू असून त्यांना पकडण्यात आल्यानंतर आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची व आणखी काही मुद्देमाल हस्तगत होण्याची शक्यता असल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले. चांगली कामगिरी करणाऱ्या पथकातील कर्मचाऱ्यांना रिवॉर्ड देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जप्त केलेले दागिने ज्या व्यक्तींचे आहेत, त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दागिने घेऊन जावेत, असेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!