दानापूर येथील जातीय तणाव प्रकरण, पोलिसांना सूचना देऊन दोषीवर कडक कारवाई करू,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले पोलिसांना आदेश
प्रसारमाध्यमांना दिली माहिती
चांदूर रेल्वे – (सुभाष कोटेचा)
सततच्या जातीय अत्याचाराच्या निषेधार्थ चांदूर रेल्वे तालुक्यातील दानापूरच्या ६० ते ६५ अनुसुचित जातीच्या लोकांनी गाव सोडून पाझर तलावाजवळ मुक्काम ठोकला व मालमत्तेच्या संरक्षणाची जबाबदारी प्रशासनावर सोडली. सदर प्रकरण शनिवारी राज्यभर गाजले. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही प्रसारमाध्यमांशी बोलतांना प्रतिक्रीया देत पोलिसांना सूचना देऊन दोषींवर कडक कारवाई करू असे म्हटले.

चांदूर रेल्वे तालुक्यातील दानापूर येथील सवर्णांनी गावातील अनुसुचित जातीच्या लोकांच्या शेतात जाणारा पिढीजात वहीवाटीचा रस्ताच बंद केला. त्यामुळे त्यांची मशागत व इतर शेती कामे खोळंबली. ऐन पेरणीच्या वेळी ट्रॅक्टर अडवुन त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी चौघांवर अॅट्रोसिटीसह अन्य गुन्हे दाखल झालेले आहे .मात्र स्थानिक एसडीपीओंनी सदर प्रकरणच दाबुन टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच सवर्णांचे मनोबल वाढले आणि त्यांनी या समाजाच्या युवतींना त्रास देणे सुरू असुन या प्रकरणात गुन्हे दाखल झाले. रस्ता अडवणुक प्रकरणात गुन्हे दाखल झालेले आरोपी अद्यापही मोकाट आहेत असे दलीत बांधवांनी म्हटले. वहीवाटीच्या रस्त्यासाठी स्थानिक तहसीलदाराकडे २३/०७/२१ दाखल केसवर चार महिणे होऊनही निकाल लागलेला नाही. तसेच १८ ऑक्टोबरला दानापूरच्या त्या कथीत सर्वणांनी निखिल चांदणे यांच्या शेतातील सोयाबीन जाळले. यातील संशईताची नावे देऊनही पोलिसांकडून ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करण्यात आला. या सर्व त्रासाला कंटाळून ६० ते ६५ अनुसुचित जातीच्या लोकांनी शुक्रवारी गाव सोडल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

याविषयी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सुध्दा प्रसारमाध्यमांना अमरावती येथे शनिवारी प्रतिक्रीया दिली. या प्रकरणात अन्याय ज्याच्यावर झाला आहे त्याला न्याय मिळालाच पाहिजे. पोलिसांना याबाबत ताबडतोब सूचना दिल्या आहे व न्याय मिळवून देण्याबाबत आदेशित करण्यात आल्याचे गुहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले. यामुळे आता यावर काय तोडगा निघतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

१)अनेक मान्यवरांनी दिल्या पाझर तलावाजवळ भेटी
या प्रकरणाची माहिती होताच सदर गावातील पाझर तलावाजवळ शनिवारी फुले, आंबेडकरी विचारवंत दिलीप एडतकर, काँग्रेसचे नेते किशोर बोरकर, पीरिपाचे प्रदेश सचिव चरणदास इंगोले, भीमशक्ती चे विदर्भ प्रदेशाध्यक्ष पंकज मेश्राम, जय संविधान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अलिम पटेल, किरण गुडधे, अन्सार बेग, सैय्यद एजाज खान, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष देविदास राऊत, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव प्रा. रवींद्र मेंढे यांनी भेटी दिल्या. तसेच प्रशासकीय मधून समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, सहाय्यक आयुक्त माया केदार, चांदूर रेल्वे चे तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी भेटी देऊन नागरिकांची चर्चा केली.

२)तत्काळ कारवाई करा – माकपा
दानापूर येथील अनुसूचित जातीच्या लोकांवरील अत्याचाराची सखोल चौकशी करून संबंधित अत्याचारी जातीयवादी लोकांवर कारवाई करावी अन्यथा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकपा) यांच्या वतीने अमरावती जिल्ह्यात आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन शनिवारी अमरावतीचे निवासी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महादेव गारपवार, शाम शिंदे, किशोर शिंदे, दिलीप शापामोहन यांची उपस्थिती होती.
