अंजनगाव सुर्जी तालुक्यातील भंडारज येथील शेतातील झोपडीला दिनांक २६ फेब्रवारी शनिवार रोजी दुपारी ३:३० वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली. आग इतकी भीषण होती, या आगीत एका गायीचा जळून मृत्यू झाला असून दुसरी गाय ही गंभीर जखमी झाली आहे. शेतकरी धनराज घटाळे भंडारज यांच्या शेतातील झोपडीला दुपारी अचानक आग लागल्याने झोपडीत असलेल्या दोन गायी गंभीर जळल्या असून त्यामधली एका गायीचा जळून जागीच मृत्यू झाला तर दुसरी गाय गंभीर रित्या जळल्याने जखमी झाली.
तसेच शेतातील झोपडी जळून खाक झाली व शेतातील ठिंबक स्प्रिंकलर पाईप, संत्र्याची झाडे, सागवानची झाडे जळली आहे. जखमी झालेल्या गायीच्या उपचारसाठी सातेगाव येथील डॉ. सोपान ठाकरे यांना बोलावण्यात आले असून गायीचा उपचार चालू आहे. सदर घटनेची माहिती महसूल विभागाला देण्यात आली असून भंडारज येथील तलाठी अरुण अरबाड यांनी घटनास्थळी पोहोचून झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला. यावेळी प्रमोद पाटील दाळू, धनराज घटाळे, डॉ सोपान ठाकरे घटनास्थळी उपस्थित होते. ही आग कशामुळे लागली याची अद्याप माहिती मिळाली नाही. शेतात लागलेल्या आगीत धनराज घटाळे यांच्या शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली.