राजगुरूनगर खेड वार्ता :- पुणे जिल्ह्यातील खेड परिसरात झालेल्या एका खून प्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. एका 28 वर्षीय तरुणाचा खून करून पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाटाच्या खोल दरीत त्याचा मृतदेह फेकून दिला होता.
पोलिसांनी दोन दिवसांत या प्रकरणाचा छडा लावला असून दोघांना अटक केली आहे. जुन्या भांडणाच्या वादातून मित्रांनीच हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुणे नाशिक महामार्गावरील खेड घाटातील खोल दरीत एका तरुणाचा मृतदेह आढळला होता.जुन्या भांडणाच्या वादातून मित्रांनी मित्राचाच कोयत्याने वार करून त्याचा निर्घुण खून करण्यात आला होता. स्वप्नील सखाराम चौधरी वय 28 वर्ष असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. खेड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. त्यानंतर अवघ्या काही तासातच त्यांनी या प्रकरणाचा छडा लावला.
