पुणे वार्ता – : राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारा नगरपालिकांचा समावेश आहे.
चाकण ,राजगुरूनगर, आळंदी, बारामती, शिरूर, दौंड, लोणावळय़ासह इतर नगरपालिकांची निवडणूक होणार असून जिल्ह्यातील नेते मंडळींनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत आराखडे बांधायला सुरुवात केली आहे. प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.
कोरोनामुळे लावण्यात आलेले निर्बंध, राज्यातील राजकीय स्थिती आणि इतर मागासवर्गाच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणाचा पेच अशा विविध कारणांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने हालचाली सुरू आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास चालढकल केली जात होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपलेल्या किंवा मुदत संपणाऱ्या नगरपालिकांच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये निवडणूक प्रभागाच्या सीमांची प्रसिद्धी, हरकती व सूचना मागवणे, प्राप्त हरकतींवर सुनावणी आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. आयोगाने यंदा अ, ब, आणि क वर्ग नगरपालिकांसाठी स्वतंत्र कार्यक्रम जाहीर केला आहे.

दरम्यान, मे २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या आणि मुदत संपणाऱ्या नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्ह्यातील बारामती, शिरूर, दौंड, लोणावळा, चाकण, राजगुरूनगर, जेजुरी, आळंदी, सासवड, तळेगाव दाभाडे, जुन्नर आणि इंदापूर या नगरपालिकांची मुदत संपत आहे. सात नगरपालिकांची मुदत चालू महिन्यातच संपली आहे, तर तळेगाव दाभाडे, लोणावळा आणि जुन्नर नगरपालिकांची मुदत जानेवारी महिन्यात संपली. चाकण नगरपालिकेची मुदत नोव्हेंबर २०२० मध्ये, तर राजगुरूनगर नगरपालिकेची मुदत मे २०२० मध्ये संपली आहे. सध्या चाकण आणि राजगुरूनगर येथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रभाग रचनेचा कार्यक्रम ; पुणे जिल्ह्यातील बारा नगरपालिका/नगरपरिषद यांचा समावेश