जेष्ठ समाजसेवक लॉ. धाडवे यांना राज्यपालांच्या हस्ते राजभवनात कर्तव्यम् प्रेरणा पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम – येथील जेष्ठ समाजसेवक लॉ. वसंतराव धाडवे यांच्या सामाजीक कार्याची दखल घेवून पुणे येथील कर्तव्यम सोशल फाऊंडेशनच्या वतीने जाहीर झालेला कर्तव्यम् प्रेरणा पुरस्कार २२ फेब्रुवारीला राजभवन येथे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते व कर्तव्यम सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष बारणे तथा सचिव क्रांती महाजन यांच्या उपस्थितीत धाडवे यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी राज्यपालांनी सामाजीक कार्यकर्त्यांची समाजाला व देशाला नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केले. ते म्हणाले की, आपल्याजवळ पैसा किती आहे याला महत्व नसून आपण किती सामाजीक कार्य करतो हे महत्वाचे आहे. आपल्या निरंतर व निस्वार्थ समाजकार्याची नोंद समाज सतत घेत असतो. तसेच समाजसेवक हे समाज व देशाला नवी दिशा दाखविण्याचे कार्य करत असतात असे महामहीम राज्यपाल आपल्या भाषणात म्हणाले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कर्तव्यम सोशल फाऊंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याची दखल घेवून त्यांना या कार्यक्रमात पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सन्मानचिन्ह, स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. धाडवे यांना यापुर्वी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सामाजीक कार्यात अग्रेसर असलेल्या लॉ. वसंतराव धाडवे मित्रमंडळाच्या वतीने लॉकडाऊन कालावधीत आपले सामाजीक कर्तव्य समजून वाशिम जिल्हयात वितरीत केलेल्या १० हजार माहितीपत्रकाव्दारे जनतेत करोना आजाराविषयी जनजागृती केली होती. शिवाय लॉकडाऊन काळात नागरीकांची उपासमार होवू नये याकरीता वारा जहांगीर व वाशीम येथील गटई कामगारांचे कुटुंब व गोरगरीब अशा ५७ परिवारांना जीवनावश्यक वस्तू, किराणा, अन्नधान्य व भाजीपाल्याचे वाटप करण्यात आले होते. सोबतच जनतेच्या सुरक्षेसाठी आपला जीव धोक्यात घालुन रस्त्यावर अहोरात्र सेवा देणार्या पोलीस विभागाच्या सुरक्षेसाठी ३० हजार रुपये किंमतीचे ५०० मुख आवरणे (फेसशिल्ड) तसेच ६० हजार रुपयाचे बॅरीकेटस पोलीस विभागाला देण्यात आले होते.

तसेच पुण्यावरुन परत आलेल्या मजुरांना खिचडी पाकीटाचे वाटप करण्यात आले होते. रंजल्या गांजल्यांमध्ये देव पाहण्याचे काम करणार्‍या लॉ. वसंतराव धाडवे मित्रमंडळाने सामाजीक बांधीलकी ठेवून अनेक होतकरु गरीबांना मदत केली आहे. लॉ. धाडवे यांचे वाशीम व परभणी जिल्हयात उल्लेखनिय शैक्षणिक व सामाजीक कार्य असून येथील विविध सामाजीक संघटनांशी निकटचा संबंध आहे. राज्यपालांच्या हस्ते हा सन्मान प्राप्त झाल्याची बाब जिल्ह्यासाठी भुषणासह आहे. या पुरस्कारामुळे आपली सामाजीक कार्याची जबाबदारी वाढली असल्याचे प्रतिपादन लॉ. धाडवे यांनी यावेळी केले. मिळालेल्या पुरस्कारामुळे लॉ. धाडवे यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!