प्रतिनिधी ओम मोरे
कठोरा नाका चौकाचे राजमाता जिजाऊ चौक नामकरण
शिवपुत्र फाउंडेशन ,मराठा सेवा संघ , जिजाऊ ब्रिगेड , संभाजी ब्रिगेड यांचा संयुक्त शिवजयंती सोहळा
अमरावती २० फेब्रुवारी : कठोरा नाका चौक परीसर येथे शिवपुत्र फाउंडेशन ,मराठा सेवा संघ , जिजाऊ ब्रिगेड , संभाजी ब्रिगेड व प्रशांत डवरे मित्र मंडळ ,यांचे संयुक्त विद्यमाने शिव जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

आमदार सौ. सुलभाताई खोडके यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यकर्मप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष-संजय खोडके , संत गाडगेबाबा जेष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष-डॉ. सतिश तराळ , मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष – आश्विन चौधरी , प्रदेश उपाध्यक्ष – अरविंद गावंडे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडी जिल्हाध्यक्ष – संगीता ठाकरे , जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा – मनाली तायडे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक – प्रशांत डवरे , नगरसेविका – नीलिमा काळे , मंजुश्री महल्ले आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ चौक या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. तद्नंतर जेष्ठ नागरिकांकरिता बनविण्यात आलेल्या विसावा स्थळाचे सुद्धा लोकार्पण करण्यात आले.

यानंतर आमदार महोदयांसह अतिथींचे वतीने यशवंत , किर्तीवंत , सामर्थ्यवंत , वरदवंत , किर्तीवंत , नीतीवंत जाणता राजा शिवछत्रपती यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करीत मानाचा मुजरा करण्यात आला. यादरम्यान सामूहिक जिजाऊ वंदना सादर करण्यात आली. यावेळी आयोजकांचे वतीने अतिथी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मोहिमांवर जातांना शिवाजी महाराजांनी कुठलाही मुहूर्त पाहिला नाही. उलट जास्तीत जास्त मोहिमा त्यांनी अमावसेच्याच रात्री फत्ते केल्या. कारण अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेऊन शत्रू सैन्यावर आक्रमण करून सुरक्षितपणे परत फिरता येते. हे तंत्र शिवरायांना ज्ञात होते. हीच शिवनीती आहे.धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव आपल्या कृतीतून अवलंबविणारे राजे म्हणजे शिवाजी राजे होय. राजमाता जिजाई या नावाकडे लक्ष वेधीत जी म्हणजे जिज्ञासा जा म्हणजेच जाणणारी ई म्हणजे ईश्वरनिष्ठ असे महत्व विशद करीत माँ जिजाऊंनी शिवरायांना दिलेले संस्कार देणाऱ्या माता प्रत्येक घरी असणे ही काळाची गरज आहे. तरच शिवबा सारखे पुत्र घरोघरी जन्माला येतील. या शब्दात आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी उपस्थितांना संबोधित केले.

तद्नंतर अतिथीय भाषणात डॉ. सतीश तराळ यांनी मध्ययुगीन काळात राजा होणे राज्याभिषेक करणे या बाबी अशक्य होत्या. त्या बाबी शिवाजी महाराजांनी शक्य करून दाखविल्यात. हे केवळ प्रागतिक विचारांच्या बळावरच शक्य आहे. हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध करून दाखविले. शिवाजी राजे हे समतावादी व विज्ञानवादी होते.शिवरायांची धोरणे व कृती आजच्या काळातही प्रस्तुतच नव्हे, तर आदर्शभूत ठरतात अशी माहिती विशद केली. आपल्या प्रस्ताविकपर भाषणात नगरसेवक-प्रशांत डवरे यांनी शहराचा विकास व विस्तार होत असताना आपल्या इतिहासकालीन कर्तृत्ववान महिलांच्या अलौकिक कार्याची माहिती नवीन पिढीला व्हावी . तसेच माँ जिजाऊ यांच्या स्वप्नपूर्ती ला प्रत्यक्षात उतरविण्याचे प्रेरणा सर्वाना मिळावी. हा उद्देश नजरेसमोर ठेवण्यासह मनपा मध्ये आवश्यक प्रक्रियेची पूर्तता करीत आता स्थानिक परिसर हा राजमाता जिजाऊ चौक या नावाने ओळखला जाणार आहे. असे यावेळी त्यांनी सांगितले. कार्यक्रमांती चैतन्य नांदूरकर या युवकाने शिवगर्जना सादर केली.
