Post Views: 404
अखेर तालुक्यातील प्रकल्पग्रस्त गावातील पथदिव्यांचा विजपुरवठा पुर्ववत सुरू,
एसडीओ कार्यालयासमोरील उपोषणाची पहिल्याच दिवशी सांगता, आमदार अडसड यांची मध्यस्थी
चांदूर रेल्वे प्रतिनिधी (सुभाष कोटेचा) :-
चांदूर रेल्वे तालुक्यातील महसुली दर्जा प्राप्त नसलेल्या बेंबळा नदी प्रकल्पग्रस्त गावातील पथदिव्यांचा वीजपुरवठा गेल्या महिण्याभऱ्यापासून खंडित करण्यात आला होता. या विरोधात २० ऑक्टोंबर पासून नागरिक चांदूर रेल्वे येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी आमदार प्रताप अडसड यांनी भेट देऊन मध्यस्थी केली असुन प्रकल्पग्रस्त गावातील पथदिव्यांचा विजपुरवठा पुर्ववत सुरू करण्यात आला आहे. यानंतर उपोषण मागे घेण्यात आले असुन गावात लख्ख प्रकाश आता पहावयास मिळत आहे.
पहिल्याच दिवशी बुधवारी सायंकाळी आमदार प्रताप अडसड यांनी उपोषणमंडपाला भेट दिली. व यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्यासमवेत फोनवरून चर्चा केली. यावेळी उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी, तहसिलदार राजेंद्र इंगळे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सागर नाईक उपस्थित होते. यानंतर चर्चेतून तोडगा काढत सदर गावांचा पथदिव्यांचा विद्युत पुरवठा तत्काळ पुर्ववत सुरू करण्यात आला. याबाबतचे निर्देश महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सागर नाईक यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिले. तसेच या प्रकल्पग्रस्त ग्रामपंचायतीचे विज देयके कोण भरणार या करिता अमरावती येथे सोमवारी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपोषणमंडपात अनेकांची उपस्थिती होती.