अटी आणि शर्तीच्या अधिन राहून खडकेश्वर बैलगाडी शर्यतीस परवानगी

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम: वाशिम तालुक्यातील देवळा रोड, खडकेश्वर येथे 22 व 23 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या बैलगाडी शर्यतीस साथरोग अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन कायदा व फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार कोविडविषयक शासनाने वेळोवेळी पारीत केलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार अटी व शर्तीच्या अधिन राहून जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी एका आदेशाव्दारे परवानगी दिली आहे.

गाडीवान म्हणून बैलगाडी शर्यतीत सहभाग घेऊ इच्छिणारा कोणताही गाडीवान किंवा सहभागी व्यक्तीस त्याच्या ओळखीबाबतचा पुरावा आणि बैल व वळू यांचे छायाचित्र यासह शर्यतीच्या 48 तास आधी आयोजकांकडे अनुसूचि- सी मध्ये अर्ज करावा लागेल. या शर्यतीत भाग घेणाऱ्या सर्व व्यक्ती नोंदणीकृत पशुवैद्यकीय व्यवसायीकांकडून बैलाची/वळूची तपासणी करुन आणि ते निरोगी असल्याचे प्रमाणित करुन घ्यावेत. शर्यतीच्या अगोदर अनुसूचि-ब मध्ये नमुद केलेल्या नमुन्यामध्ये नोंदणीकृत पशुवैद्यकीय व्यावसायीकाचे प्रमाणपत्र सादर करावे. फिटनेस प्रमाणपत्राची वैधता किंवा शर्यतीचे दिवस धरुन 48 तास इतकी असेल. शर्यतीचा प्रारंभ होण्यापूर्वी, शर्यतीस उपस्थित राहणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना आयोजकाकडून अर्जाचे नमुने आणि नोंदणीकृत पशुवैद्यकीय व्यावसायीकांचे फिटनेस प्रमाणपत्र सादर करावे. ज्या गाडीवानाकरीता व बैलाकरीता अर्जाचे नमुने आणि पशुवैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्रे प्राप्त केली आहे, आणि ती त्यांनी सदर अधिकाऱ्यांकडे सादर केली आहे. केवळ तोच गाडीवान व बैल/वळू शर्यतीत आणि कोणत्याही स्पर्धेत भाग घेण्यास हक्कदार असेल.

आयोजकांनी बैलगाडी शर्यतीचे अर्जात आणि दिलेल्या परवानगी निश्चित केलेल्या ठिकाणी व दिनांकास स्पर्धेचे आयोजन करणे बंधनकारक राहील. शर्यतीमध्ये 1000 मिटरपेक्षा अधिक लांबीचे धावण्याचे अंतर नसेल, अशा योग्य धावपट्टीवर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात यावे. आयोजकांनी बैलगाडी शर्यतीमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांच्या नावाचा अभिलेख, प्राण्यांचे फिटनेस आरोग्यविषयक प्रमाणपत्र व बैलगाडी शर्यतीमध्ये भाग घेणाऱ्यांचा इतर तपशिल जोडावा. बैलगाडी शर्यतीची धावपट्टी ही अतिशय उतार असलेली दगड किंवा खडक असलेली, चिखल, दलदल असलेली पानथळीची किंवा पातळ चिखल असलेले ठिकाण असलेली नसावी. बैलगाडी शर्यत रस्त्यावर किंवा महामार्गावर आयोजित करण्यात येऊ नये. बैल व वळूला धावपट्टीवर आणण्यासाठी किमान 20 मिनिटे आराम दयावा. वळूचा किंवा बैलाचा वापर एका दिवसामध्ये तीनपेक्षा अधिक शर्यतीत करण्यात येऊ नये. कोणतेही वाहन धावपट्टीवर किंवा धावपट्टी बाहेर बैलगाडी भोवती चालविता येणार नाही. गाडीवर कोणतेही काठी, चाबुक, पिंजरी किंवा बैलास दुखापत करु शकेल किंवा बैलास विजेचा धक्का देऊ शकेल असे कोणतेही साधन किंवा उपकरण बाळगणार नाही याची दक्षता घ्यावी.

वळू किंवा बैलाच्या जनन अंगावर लाथ मारणे किंवा इजा पोहचविणे अथवा शेपूट पिरगळणे किंवा शेपटीस चावा घेणे यास गाडीवानास प्रतिबंध राहील. शर्यतीत धावणाऱ्या जोडया हया एकमेकाशी सुसंगत असाव्यात. इतर कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांसोबत बैल किंवा वळूला शर्यतीत जुंपण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यांच्या आरामाच्या जागेत पुरेशी सावली, पुरेशे खाद्य, पिण्याचे पाणी उपलब्ध असावेत. आरामाची जागा निटनेटकी व स्वच्छ असावी. वळू किंवा बैलांना शर्यतीपूर्वी कोणतेही उत्तेजक औषधी द्रव्ये, अल्कोहोल, क्षोभक पदार्थ दिले जाणार नाही याची खात्री करावी. शर्यतीच्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या कोणत्याही गाडीवानाला अल्कोहोल किंवा मादक द्रव्य वापरण्यास व बाळगण्यास मनाई राहील. दुखापत झालेले वळू यांना शर्यतीमध्ये परवानगी देण्यात येऊ नये. आयोजकांनी बैलगाडी शर्यतीच्यावेळी प्रेक्षकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.

धावपट्टीच्या दोन्ही बाजूस प्रतिबंधात्मक कठडे उभारावे. शर्यतीदरम्यान गाडीवानास, बैलगाडीच्या चाकात वा इतरत्र अडकून अपघात होऊ शकेल अशा प्रकारचे कोणतेही सेल किंवा तशा प्रकारचे कपडे घालण्यास परवानगी देऊ नये. स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या व्यक्तींची माहिती बैलगाडी शर्यतीच्या अनुपालन अहवाल आणि संपूर्ण आयोजनाचे डिजीटल स्वरुपातील चित्रीकरण बैलगाडीची शर्यत संपल्यानंतर 15 दिवसाच्या आत जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे सादर करावे. बैलगाडी शर्यतीचे आयोजन अधिनियम आणि नियमातील शर्तीनुसार झाले नाही तसेच आयोजकांनी डिजीटल स्वरुपातील चित्रीकरण सादर करण्यास कसुर केला तर तसेच कोणत्याही व्यक्तींकडून किंवा प्राण्यांना क्रुतेने वागविण्यास प्रतिबंध करणाऱ्या जिल्हा सोसायटीकडून स्पर्धा सुरु झाल्यापासू 48 तासाच्या आत जिल्हाधिकारी यांना कोणतेही शर्यतीचे भंग झाले या विषयीची तक्रार प्राप्त झाली असेल तर आणि आयोजकांनी शर्तीचा भंग केला असल्याची जिल्हाधिकारी यांची खात्री पटली असेल तर आयोजकांची 50 हजार रुपये इतकी प्रतिभूती ठेव जप्त करण्यात येईल. व आयोजकांना बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यास तसेच यापुढे अशी शर्यत आयोजित करण्यास मनाई राहील.

कोविड लसीचे दोन्ही डोस झालेल्या व्यक्तीनाच या शर्यतीमध्ये प्रवेश देण्यात यावा. स्पर्धेच्या ठिकाणी ध्वनी प्रदुषण अधिनियमातील तरतुदीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. शर्यतीचे आयोजन करतांना प्रेक्षक क्षमतेच्या अधिकत्तम 50 प्रेक्षकांच्या उपस्थितीच्या मर्यादेत बैलगाडी शर्यतीचे आयोजन करावे. स्पर्धेसाठी उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींनी स्पर्धेपर्वी अँटीजन/आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक राहील. कोणत्याही गाडीवानाने या आदेशातील अधिनियमांच्या, नियमांच्या व देण्यात आलेल्या परवानगीच्या कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास शास्ती लादण्यात येऊन भविष्यात कोणत्याही बैलगाडी शर्यतीमध्ये सहभाग घेण्यासाठी मनाई करण्यात येईल. कोविड-19 च्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाच्या मार्गदर्शक सुचनांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस कायदेशीर तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. शर्यतीस परवानगी दिल्यापासून शर्यत आयोजित करावयाच्या दिनांकापर्यंत कोविडविषयक वा काही अन्य निर्बंध लावल्यास त्याचे पालन करणे आयोजकास बंधनकारक राहील.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!