प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम – आपला व आपल्या परिवाराचा संपूर्ण विकास होण्यासह मुख्य आर्थिक धारेत प्रवाहीत होण्यासाठी वाईट चालीरिती, अंधश्रध्दा सोडून शिक्षणाची कास धरावा असा मौलीक सल्ला अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष तथा एनडीएमजेचे राज्य सहसचिव पी.एस. खंदारे यांनी दिला. तालुक्यातील ग्राम सुकळी येथे १२ फेब्रुवारी रोजी आधार आदिवासी बहूउद्देशिय संस्थेच्या वतीने पारधी आदिवासी तांड्यात अंधश्रध्दा निर्मूलन व प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्ती अध्यक्ष दत्तराव भिसे तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा.पं. सदस्य दिलीप खडसे, माजी सरपंच राजेंद्र भोसले, नंदु चव्हाण, संस्थेच्या अध्यक्षा सौ. सौ. सुशिला ज्ञानु चव्हाण, सचिव संजय भोयर यांची उपस्थिती होती. प्रारंभी अध्यक्ष, उद्घाटक व प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अध्यक्षा सौ. सुशिला चव्हाण यांच्या हस्ते पी.एस. खंदारे यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. त्यानंतर पी.एस. खंदारे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

तसेच त्यांनी संत समाज सुधारकांचा विवेकी विचार समाजात रूजवून आपण अंधश्रद्धा मुक्त जिवन जगले पाहिजे हे सप्रयोग दाखवून दिले. पारधी आदिवासी समाजात रेड्याला जमीनीत अर्धे गाडून भाले, सुरे टोचून टोचून हाल हाल करून मारणे, देवाला प्रसन्न करण्यासाठी पशु बळी देणे हे अघोरी कृत्य थांबवुन तुपपोळीचा नैवेद्य दिला पाहिजे व अंधश्रद्धा, व्यसनापासून समाजाने दुर राहून शिक्षणाची कास धरुन मानसन्मानाचे जिवन जगले पाहीजे असा मौलिक सल्ला खंदारे यांनी उपस्थितांना दिला.
