संकलन – महेश बुंदे
बावंची – दुर्लक्षित तणवर्गीय औषधी वनस्पती, ही वनस्पती राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, गुजरात व महाराष्ट्र राज्यांमध्ये आढळून येते. मुख्यत: ही काळया मातीमध्ये(Black cotton soil) नैसर्गिक रित्या उगवते. हिच्या अनेक औषधी गुणधर्मामुळे आयुर्वेदात हिचे महत्त्व आहे. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव सोरॅलिया कोरॅलीफोलीया असे आहे. शेंगवर्गीय फॅबेसी कुळातील ही वनस्पती आहे.’सोरॅलिया ‘ हा शब्द ग्रीक भाषेतील असून त्याचा अर्थ ‘खाज किंवा कुष्ठरोगाने प्रभावित ‘असा होतो. आयुर्वेदात देखील या वनस्पतीस ‘कुष्ठ नाशिनी ‘ म्हणजेच कुष्ठरोगाचा नाश करणारी असे संबोधल्या जाते. मराठी व हिंदी मध्ये बावची/ बावंची असे म्हणतात. संस्कृतमध्ये चंद्राला जेवढी नावे त्या प्रत्येकपुढे रेखा, लेखा, राजी यापैकी एक शब्द जोडला म्हणजे बावचीची नावे तयार होतात.उदा. सोमरेखा, शशांकलेखा, चंद्रलेखा, सोमराजी. याव्यतिरिक्त वेगवेगळ्या ३१ संस्कृत नावाने ही वनस्पती ओळखली जाते.

ही वनस्पती वर्षायु आहे परंतु याची काळजी घेतल्यास झाड पाच ते सात वर्ष देखील टिकते. वनस्पतीची उंची साधारणपणे ६० ते १८० सेंटीमीटर पर्यंत असते. खोडांवर व पानांवर बारीक लव असते. पाने लांबट, गोल ,दंतुर कडा असणारी असतात. ऑगस्ट ते डिसेंबर च्या दरम्यान पानांच्या बुचक्यात लांब दांड्यावर गुलाबी जांभळ्या फुलांचे गुच्छ येतात. फुले अगदी छोटी छोटी असतात तर शेंगा देखील लहान व चपट्या असतात. बिया आयताकृती चपट्या असून त्यास विशिष्ट तीक्ष्ण गंध -खरे तर दुर्गंधचअसतो. बिया हातांवर चोळल्या तरी वास येतो. आतापर्यंतच्या संशोधना नुसार वनस्पतीमध्ये वेदनाशामक, प्रजनन क्षमता, मधुमेहाविरोधी, दाहनाशक, कर्कविरोधी इत्यादी गुणधर्म आहेत. या वनस्पतीचा उपयोग दमा, श्वासनलिकेचे विकार त्वचा विकार ,अपचन, मूळव्याध ,जखम ,व्रण ,खरुज, कोड व कुष्ठरोगावर होतो. संशोधन संदर्भानुसार आयुर्वेदामध्ये या वनस्पतीचा उपयोग खालीलप्रमाणे केल्या जातो. (उपयुक्त भाग म्हणजे मुख्यतः याच्या बियाच आहेत बियांमधील तेल काढून ते वापरले जाते.) बियांची बारीक भुकटी करून त्याचे मलम तयार करतात ते कोड, कुष्ठरोग ,चर्मरोग आदींवर उपयोगी आहे तसेच चूर्णाऐवजी तेलही वापरले जाते. तेल किंवा बियांचा लेप टक्कल पडल्यास केस वाढवण्यासाठी लावतात. बावची तेल, करंज तेल व व्ह्यासलीन एकत्र करून ते मलम लावल्यास जुनाट चर्मरोगावर उपयुक्त आहे. बियांचा वापर दात व हाडांच्या विघटनावर करतात. याच्या बिया उलट्या थांबविण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
या वनस्पतीच्या बियांचा उपयोग सौंदर्य प्रसाधनांमध्ये केल्या जातो. (त्वचेवर गुणकारी असल्यामुळे). त्वचेवरील सुरकुत्या घालवण्यासाठी उपयुक्त. रक्त शुद्धीकरण व रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ही वनस्पती उपयुक्त आहे. चंद्रप्रभावटी , समराघोत बावची चूर्ण व खानदिरास्ठा इत्यादी आयुर्वेदिक औषधी मध्ये या वनस्पतीचा वापर केल्या जातो. ही वनस्पती तणवर्गीय असल्यामुळे दुर्लक्षित राहिली आहे. हिची लागवड केली जात नाही याच्या बिया रूजवून रोपे तयार करता येतात.’राष्ट्रीय औषधी’ मंडळ यांच्या द्वारे प्रकाशित ‘ॲग्रोटेकनीक ऑफ सिलेकटेड मेडिसिनल प्लांट्स’भाग २ मध्ये याची लागवड काढणी व त्यासाठी लागणारा खर्च व आवश्यक जमीन इत्यादी संबंधीची माहिती दिलेली आहे. त्या आधारे याची लागवड करता येईल. कमी पावसाच्या किंवा मध्यम पावसाच्या भागात काळ्यामातीत याची लागवड करता येईल .या वनस्पतींच्या वाढीकरिता मुख्यतः उबदार जागा आवश्यक असते . या वनस्पतीचे आंतरपिक घेता येऊ शकते. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेतकरी, पत्रकार व इतर ठिकाणावरून मिळालेल्या माहितीनुसार बावची बियांना बाजारात मागणी असून ह्या बिया साधारण ७० ते ९० रुपये किलो भावाने विकल्या जातात. शेताच्या बांधावर किंवा आंतरपीक म्हणून याची लागवड करणे फायद्याचे राहू शकते. या वनस्पतीच्या अधीक माहिती करिता डॉ. प्रभा भोगावकर यांनी वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंगेश डगवाल यांना सहकार्य केले आहे . या वनस्पतीच्या लागवडीबद्दल विचार करावा असे आवाहन डॉ. मंगेश डगवाल वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख श्रीमती. राधाबाई सारडा महाविद्यालय अंजनगाव सुर्जी यांनी केले आहे.
लेखन- डॉ. मंगेश डगवाल वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख श्रीमती. राधाबाई सारडा महाविद्यालय अंजनगाव सुर्जी. जि. अमरावती.
टीप :- (सदर लेख,बातमीशी स्वराज्य वार्ता सहमत असेलच असे नाही (प्रयोग – डॉक्टर सल्ला मार्गदर्शन नुसार करावा)..)