बीड वार्ता :- स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून शिधापत्रिका धारकांना वाटप करण्यासाठी देण्यात आलेल्या धान्याचा साठा करुन त्याची काळ्या बाजारात विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. ब्रह्मगाव (ता.माजलगाव) येथे पत्र्याच्या गोदामावर छापा टाकून पोलिसांनी काळ्या बाजारात जाणारा ५५८ पोते तांदूळ शनिवारी पहाटे पकडला.
यावेळी सात लाखाच्या तांदळासह मालवाहू मोटार असा एकूण ३१ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन तिघा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
बीड जिल्ह्यातील ब्रह्मगाव (ता. माजलगाव) शिवारात शनिवार १२ फेब्रुवारी रोजी सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने पत्र्याच्या गोदामावर छापा टाकला. त्या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ साठा करुन ठेवल्याचा आढळून आला. गोदामासमोरच मालवाहू मोटार क्र. एमएच १५ एफव्ही ६३५७ मध्ये तांदळाचे ५५८ पोते भरुन ते काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाण्याच्या उद्देशाने आढळून आले.
