मिरवणुकीत दहा दिंड्या सहभागी, असंख्य नागरीकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ ; लहान मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने फेडले प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे
दर्यापूर – महेश बुंदे
तालुक्यातील तोंगलाबाद येथे ग्रामदैवत श्री संत लष्करी हनुमान महाराज पुण्यतिथी निमित्ताने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा श्री संत हनुमान महाराज संस्थान व युवा यात्रा महोत्सव समिती आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने भव्य यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात सात दिवस श्रीमद भागवत सप्ताह,काकडा आरती,हरिपाठ व हरकीर्तन,अन्नदान व होमहवन असे कार्यक्रम संपन्न झाले.

या भव्य यात्रा महोत्सवाचा समारोप दि. ११ फेब्रुवारी शुक्रवार रोजी झाला. यावेळी सकाळी श्री गजानन महाराज शास्त्री कार्लेकर याचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले व त्यानंतर गावांमधून श्री’ची भव्य पालखी मिरवणूक व शोभायात्रा निघाली. यामध्ये १० सांप्रदायिक दिंड्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी दिंडी स्पर्धा घेण्यात आली,यावेळी एकूण ३५ हजाराची बक्षिसे देण्यात आली. या पालखी मिरवणुकीचा समारोप दहीहंडी व बक्षिस वितरण कार्यक्रमाने झाला व त्यानंतर संस्थानच्या वतीने व गावकऱ्यांच्या सहकाऱ्याने भाविक भक्तासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या सर्व यात्रा महोत्सवाची सांगता संध्याकाळी गावातील लहान मुलाच्या दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. यावेळी लहान मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.यावेळी लहान मुलांच्या नृत्यासाठी २० हजार रुपयांची बक्षिसे उपस्थित नागरिकांच्या वतीने देण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषद शिक्षिका यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाला त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. या यात्रा महोत्सव निमित्ताने ४० व्यावसायिक दुकानदार सहभागी झाले होते. दहा दिवसापासून सुरू असलेला यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री संत हनुमान महाराज संस्थान व युवा व युवती यात्रा महोत्सव समितीचे सदस्य आणि गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.

मिरवणुकीत दहा दिंड्या सहभागी…..