खबरदार : लसीकरणासाठी प्रोत्साहन व समुपदेशन करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना धमकाविल्यास कारवाई होणार

प्रतिनिधी फुलचंद भगत :-


वाशिम -जिल्ह्यातील सर्व पात्र व्यक्तींचे १००% कोविड लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी काही व्यक्तींचे समुपदेशन तर काही व्यक्तींना लसीकरणासाठी प्रोत्साहित करताना काही पात्र व्यक्ती ह्या लसीकरण करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना शिवीगाळ करीत आहे.तर काही व्यक्ती कर्मचाऱ्यांना धमक्या देत असल्याची माहिती मिळाली आहे. लसीकरण करणार्‍या कर्मचार्‍यांना धमकावून लस न घेता त्यांच्या कामात व्यत्यय आणणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.


जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील संशोधकांच्या अथक संशोधनातून कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाली. त्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग आणि होणारे मृत्यू आटोक्यात आणण्यात यश आले. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी ठरलेली लस देण्यास १६ जानेवारीपासून जिल्ह्यात सुरुवात झाली.अनेकांनी या लसीचे दोन्ही डोस घेतले. काही पात्र व्यक्तीने पहिला डोस घेतला आहे तर काहींचा दुसरा डोस घेणे बाकी आहे. तर काहींनी अद्यापपर्यंत एकही डोस घेतलेला नाही.

ज्यांनी अद्यापही एकही डोस घेतला नाही त्यामागील कारण म्हणजे त्यांचे लसीबाबत असलेले गैरसमज आहे. कोरोना प्रतिबंधक लस ही अत्यंत सुरक्षित असून त्याबाबत गैरसमज करून घेणे हे अत्यंत चुकीचे आहे.
एकीकडे शासन विविध यंत्रणा तसेच सेवाभावी संस्था यांना सोबत घेऊन कोविड – १९ लसीकरणासाठी विविध मोहिमा आणि जनजागृती कार्यक्रम राबवीत आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थी कोरोना लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासन व विविध यंत्रणांच्या माध्यमातून जिल्ह्यातील पात्र व्यक्तींच्या १००% लसीकरणासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.विविध क्षेत्रातील व्यक्तींचा लसीकरणासाठी सहभाग घेण्यात येत आहे.


गाव पातळीवर आणि शहरी भागात पात्र व्यक्तींच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. ज्यांनी अद्यापही कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस घेतलेला नाही, अशा व्यक्तीचे कोरोना लसीकरण करणारे कर्मचारी -अधिकारी समुपदेशन करीत आहे. समुपदेशनातून हे कर्मचारी – अधिकारी संबंधित पात्र व्यक्तींना लसीकरणाचे महत्त्व व त्याची आवश्यकता पटवून देत असताना तर काहींना लस घेण्यात प्रोत्साहित करीत असताना पात्र व्यक्ती संबंधित लसीकरण कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाणे, त्यांना शिवीगाळ करणे तसेच त्यांना धमकावण्याचे प्रकार जिल्ह्यात घडत आहे. लस घेण्यास त्या कर्मचाऱ्यांना पात्र व्यक्तींनी सहकार्य करण्याऐवजी अशा प्रकाराने वागणे हे अत्यंत बेजबाबदारपणाचे आणि चुकीचे आहे.
वाशिम जिल्हा एकीकडे १००% लसीकरणाच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करीत असताना लसीकरणासाठी प्रोत्साहित करणारे आणि समुपदेशन करणाऱ्या अधिकारी – कर्मचाऱ्यांशी लसीकरणासाठी पात्र असलेल्या व्यक्तींनी अशा प्रकारची वर्तणूक केल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल.असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस आणि पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी कळविले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!