सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर बारब्दे यांच्यासह स्वच्छता दूतांचा सहभाग
दर्यापूर – महेश बुंदे
स्मशानभूमी म्हटलं की उजाड, भयाण वाटणारी जागा, असं चित्र कुणाच्या मनात उभं राहतं. मात्र
नजीकच्या कोकर्डा येथे अशी एक स्मशानभूमी उभारण्यात आली आहे, जी कुणालाही हवी हवीशी वाटेल.

कोकर्डा येथील तयार केलेली ही स्मशानभूमीच काही वेगळ्या प्रकारची आहे. इथली हिरवाई, सुंदर बगीचा आणि अंत्यविधीसाठीच्या सोयी पाहून स्मशानभूमीबद्दलचं तुमचंही मत बदलल्याशिवाय राहणार नाही. नजीकच्या कोकर्डा येथील स्मशानभूमी सामाजिक कार्यकर्त्यांसह गावकऱ्यांच्या माध्यमातून छान उभारली गेली मात्र त्या अगोदर स्मशानभूमीच्या चहुबाजूनी काटेरी झुडपी वनस्पती वेढलेल्या होत्या. सर्वत्र घाण बजबजपुरी त्यामुळे मोठी दुर्गंधी सुटलेली होती.

स्मशानभूमी स्वच्छ सुंदर आणि यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर बारब्दे यांनी पुढाकार घेतला. ज्ञानेश्वर बारब्दे आणि त्यांच्या सवंगड्यांनी सेवाभावी वृत्तीने या सगळ्या अतिक्रमीत काटेरी झुडपे काढून परिसर स्वच्छ केला. स्मशानभूमी परिसरात फळा- फुलांची वृक्ष लागवड करण्यात आली. पर्यावरणाच्या वाढत्या ऱ्हासामुळे मानवापुढे शुद्ध हवेचे संकट ‘आ’ वासुन उभे आहे. कोरोना काळात अनेकांना ऑक्सिजन वाचुन जीव गमवावा लागला.

या संकटापासुन प्रेरणा घेऊन कोकरड्यातील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर बारब्दे यांच्यासह स्वच्छता दूत रमेश वानखडे, जीवनआप्पा काळे, रायबोले, भाऊलाल, यांनी पुढाकार घेऊन कोकरड्यातील स्मशानभूमी हरित सृष्टीसौंदर्य करण्याचा विडा उचलला आहे. स्मशानभूमीमध्ये येत असलेल्या आवारात ठीक-ठिकाणी फळे – फुले देणारे वृक्ष लागवड करण्यात पुढाकार घेत आहेत. जांभूळ, वटवृक्ष चिंच, आवळा, आंबा, अशा अनेक प्रकारचे तब्बल २ हजार ५०० रोपवन तयार केले आहे. यामुळे स्मशानात जातांना भय वाटत नाही.
