Post Views: 567
प्रतिनिधी योगेश राजापुरकर
नारायणगाव वार्ता :- श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीवर देशभरातून येणाऱ्या शिवभक्त व पर्यटकांसाठी भोसरी डेपो ते शिवनेरी किल्ला जुन्नर अशी पीएमपीएमएल बससेवा सुरू होणार असल्याची माहिती जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी दिली. आमदार अतुल बेनके यांनी 25 ऑक्टोबर 2021 रोजी पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मी नारायण मिश्रा यांना पत्र लिहून भोसरी ते किल्ले शिवनेरी जुन्नर अशी बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी केली होती. सध्या भोसरी ते मंचर पीएमपीएमएलची बससेवा सुरू असून या बसला प्रवासी वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह राज्यातून मोठ्या संख्येने पर्यटक हे शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी, जुन्नर, नारायणगाव, ओझर, लेण्याद्री येथे येत असतात. नारायणगाव, जुन्नर परिसरातील नागरिक, कामगार व विद्यार्थी पुणे, पिंपरी चिंचवडला जाण्यासाठी खासगी वाहनाने प्रवास करतात. अष्टविनायकापैकी दोन स्थळे जुन्नर तालुक्यात असल्यामुळे गणेश भक्तांचीही ये-जा असते. पीएमपीएमएल प्रशासनाने या मार्गाचा सर्व्हे नुकताच केला आहे.
केवळ आठवड्याची प्रतीक्षा
या संदर्भात आमदार अतुल बेनके यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचीही भेट घेतली. पीएमपीएमएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बससेवा सुरू करण्याच्या मागणीची दखल घेत प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यापासून भोसरी ते किल्ले शिवनेरी जुन्नर या बससेवेचा लाभ शिवभक्तांना मिळणार आहे, अशी माहिती आमदार बेनके यांनी दिली आहे.