लातूर पोलिसांची दमदार कामगिरी ; काही तासात चोरीची घटना उघड ; तब्बल 46 लाखाचा मुद्देमाल हस्तगत

लातूर वार्ता – : नवीन एमआयडीसी भागात असलेल्या एका गोडावूनमधून १६.७ लाख किमतीचे ५४८ पोते सोयाबीन दरोडा टाकून चोरल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा पोलीस पथकांनी काही तासांतच छडा लावला. शंभर टक्के मुद्देमाल तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेले दोन ट्रक व सहा जणांना ताब्यात घेतले आहे. एकूण ४६ लाख ५० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांकडून पोलिसांनी हस्तगत केला आहे.

नवीन एमआयडीसी परिसरातील एका गोडावूनच्या वॉचमनला मारहाण करून गोडावूनमधील ५४८ सोयाबीनचे कट्टे (१६.७ लाख) चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १ फेब्रुवारी रोजी घडली होती. गोडावूनचे शटर उचकटून दोन ट्रकमधून सोयाबीन चोरट्यांनी लंपास केले होते. याबाबत एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुराग जैन, शहर पोलीस उपाधीक्षक जितेंद्र जगदाळे, औशाचे पोलीस उपाधीक्षक मधुकर पवार, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक गजानन भातलवंडे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले आदींच्या विविध पथकांनी याचा तपास केला.

पोलिसांना एका गुप्त व्यक्तीने सोयाबीन चोरीच्याबाबत माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलीस चोरटे व चोरीस गेलेल्या मालापर्यंत पोहोचले. यावेळी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता नूर इसाक सय्यद (रा. सुरत शाहवली दर्गा रोड, लातूर) असे नाव त्याचे समजले. अधिक चौकशी त्याच्याकडे पोलिसांनी केली असता अन्य दोघांनी सोयाबीनची गाडी भरायची आहे असे सांगून मला दोन ट्रकपैकी एका ट्रकमध्ये बसवून वेअर हाऊस, बाफना शोरूमसमोर नांदेड रोड येथे व दुसरा ट्रक मार्केट यार्डमधील अडत व्यापारी गोपीनाथ खाडप यांच्या दुकानाजवळ लावण्यात आला. तेथे हमालांच्या मदतीने सोयाबीन कट्टे उतरून घेण्यात आल्याची माहिती त्याच्याकडून मिळाली.

त्यावरून अडत दुकानदार गोपीनाथ शेषराव खाडप यांच्याकडून दरोड्यात चोरीस गेलेले २०३ सोयाबीन कट्टे व गुन्ह्यात वापरलेला ट्रक (एमएच १२ एफसी ७०२८) तसेच कृषीधन वेअर हाऊसचा मॅनेजर अजय सुग्रीव कांबळे याच्याकडून ३४५ सोयाबीनचे कट्टे व गुन्ह्यात वापरलेला ट्रक (एमएच ११ – १८८५) असा एकूण ४६ लाख ६१ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, या गुन्ह्यात सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, बालाजी कोयले, शिवगणेअप्पा व सोबतचे इतर साथीदार गुन्हा घडल्यापासून फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!