Post Views: 346
(जि.प. चे वित्त सभापती बाळासाहेब हिंगणीकर व गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना दिले निवेदन)
दर्यापूर – महेश बुंदे /
स्थानिक दर्यापूर पंचायत समितीमध्ये कार्यरत ३३ शिक्षकांना सन २०१९ व सन २०२० मध्ये त्यांच्या सेवेची १२ वर्षे पूर्ण झाल्याने जिल्हा परिषद निवड समितीने त्यांना चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू करून वेतन निश्चिती करण्याचे आदेश दिले होते. व वेतन निश्चितीची पडताळणी जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाच्या लेखाधिकारी यांचे कडुन दोन ते तीन आठवड्यात करण्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सोपवली होती. परंतु आज जवळपास दोन वर्ष होऊन सुद्धा ज्या शिक्षकांना चटोपाध्याय लागू झाला त्या शिक्षकांच्या वेतन निश्चितीची पडताळणी संबंधित कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडून न घेतल्यामुळे संबंधित शिक्षकांना त्यांना मिळालेल्या वरिष्ठ वेतनश्रेणीमुळे होणाऱ्या फरकाची रक्कम थकबाकी मिळाली नाही याबाबत मागील दीड वर्षापासून संघटना व संबंधित शिक्षक प्रशासनाला अवगत करत होते. परंतु आता शिक्षक समितीचे तालुकाअध्यक्ष तुळशीदास धांडे यांनी आक्रमक पवित्रा घेऊन त्याचा पाठपुरावा केला आहे. संबंधित शिक्षकांना मागील दोन वर्षापासून वरिष्ठ वेतन श्रेणी लागू झाली परंतु त्यांना मिळत असलेले वेतन हे जास्त प्रमाणात किंवा कमी प्रमाणात मिळत आहे का? याची पडताळणी जिल्हा परिषद च्या लेखा विभागाकडून करणे अनिवार्य असतानासुद्धा दर्यापूर पंचायत समितीतील शिक्षण विभागाने दोन वर्षापासून संबंधित शिक्षकांचे सेवा पुस्तके वेतन निश्चिती साठी जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाकडे का पाठवले नाही असा संतप्त प्रश्न शिक्षक समितीने उपस्थित केला आहे.
याबाबत जिल्हा परिषद चे वित्त व आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांच्याकडे शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दाद मागितली आहे. तसेच संबंधित शिक्षकांचे सेवापुस्तके तात्काळ जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाकडे पाठवून त्यांच्या वेतननिश्चितीच्या पडताळणी स्विकृती करिता प्रशासनाने पाठपुरावा करावा व संबंधित शिक्षकांना त्यांच्या थकबाकीची रक्कम याच आर्थिक वर्षात अदा करावी अशा आशयाचे निवेदन सुद्धा संबंधित शिक्षकांच्या नावासहित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे वित्त व आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांनी या प्रकरणाबाबत गांभीर्याने दखल घेऊन आठ दिवसांत सर्व प्रकरणे जिल्हास्तरावर स्विकृती करून निकाली काढण्याचे शिक्षक समितीला आश्वासित केले.
याप्रसंगी दर्यापूर तालुक्याचे शिक्षक समितीचे अध्यक्ष तुळशीदास धांडे, सरचिटणीस नंदकिशोर रायबोले, कार्याध्यक्ष गजानन मेहरे, कोषाध्यक्ष आल्हाद तराळ, महिला तालुकाध्यक्ष सविता ढाकरे ,महिला सरचिटणीस संगीता कोकाटे , समितीचे जेष्ठ मार्गदर्शक.संजय गावंडे, नंदकिशोर काळमेघ, शिवशंकर खंकरे , अतुल पिसोळे, सिद्धेश्वर मुंडे, इरफान पठाण, संदिप बेराड इत्यादी उपस्थित होते.