ठाणे, : डबक्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी येऊरच्या पायथ्याशी असलेल्या मिलिटरी ग्राउंडमध्ये घडली. शास्त्रीनगर येथील रहिवासी असलेल्या गौतम वाल्मिकी आणि निर्भय चौहान अशी या मृत मुलांची नावे असून त्यांचे मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. मागील दीड महिन्यापासून याच खड्ड्यात बुडून आतापर्यंत चार मुलांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
मूळचा उत्तरप्रदेश येथे राहणारा १५ वर्षीय निर्भय काही दिवसांपूर्वी त्याच्या शास्त्रीनगर येथील १२ वर्षीय गौतम या त्याच्या नातेवाईकाच्या घरी राहायला आला होता. हे दोघेजण आज दुपारी येऊरच्या पायथ्याशी असलेल्या मिलिटरी ग्राउंडच्या आवारात खोदकामामुळे तयार झालेल्या डबक्यात पोहण्यासाठी उतरले. या खड्ड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे बुडाले. हे दृश्य तेथे खेळण्यासाठी गेलेल्या काही मुलांनी पाहून याबाबत पोलिसांना माहित दिली. त्यानुसार वर्तकनगर पोलीस, अग्निशमन दल आणि ठाणे पालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. त्या दोघांचे मृतदेह बाहेर काढून वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.