Post Views: 331
बेंबळा नदी प्रकल्पग्रस्त गावातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित,गावकरी आजपासून एसडीओ कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार
चांदूर रेल्वे प्रतिनिधी सुभाष कोटेचा :-
अमरावती :- चांदूर रेल्वे तालुक्यातील बेंबळा नदी प्रकल्पग्रस्त गावातील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून या विरोधात आज २० ऑक्टोंबर पासून नागरिक चांदूर रेल्वे येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे.
चांदूर रेल्वे तालुक्यातील मौजा घुईखेड, टिटवा, येरड बाजार व सावंगा (बुजरूक) या बेंबळा प्रकल्प पुनर्वसित गावठाणातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित केल्यामुळे २ ऑक्टोंबर रोजी या गावातील नागरिकांनी नागपूर – औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवरील घुईखेड चौफुलीवर चक्काजाम आंदोलन केले होते. परंतु तरीही प्रशासनाचे डोळे उघडले नाही. सदर गावांना महसुली दर्जा प्राप्त नाही, त्यामुळे टॅक्स आकारणी नसल्याने ग्रामपंचायतकडे स्वनिधी नाही.
त्यामुळे पथदिव्यांची वीज बिल या ग्रामपंचायती भरू शकत नाही. पुनर्वसन प्रक्रिया झाली असली तरी नागरी सोयी सुविधांची कामे अद्याप पूर्ण झाली नाही. शासनाच्या अभिलाषात मंजूर कामे असून बरीच कामे अपूर्ण आहे. तरीही सदर गावातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा देयके न भरल्यामुळे खंडित करण्यात आला आहे. या विरोधात आता गावकरी आक्रमक झाले असून चांदूर रेल्वेच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आज बुधवार पासून आमरण उपोषणाला बसणार आहे. याबाबतची माहिती उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आली आहे.