तत्काळ १३२ के.व्ही. विद्युत प्रकल्प उभा करावा,आम आदमी पार्टीची मागणी, नितीन गवळी यांचे नेतृत्व
उर्जामंत्र्यांना पाठविले निवेदन
चांदूर रेल्वे – (धीरज पवार/सुभाष कोटेचा)
चांदूर रेल्वे मध्ये सोलर प्लांटचा तयार होत असुन १३२ के.व्ही. विद्युत प्रकल्प नसल्यामुळे याचा उपयोग तालुकावासीयांना होणार नाही. त्यामुळे सोलरचा उपयोग तालुक्यातच व्हावा याकरिता १३२ के.व्ही. विद्युत प्रकल्प उभा करून सुरू करावा अशी मागणी स्थानिक आम आदमी पार्टीतर्फे विदर्भ संघटन मंत्री नितीन गवळी व मेहमुद हुसैन यांच्या नेतृत्वात मंगळवारी उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी यांच्यामार्फत उर्जामंत्र्यांना निवेदन पाठवून केली आहे.
चांदूर रेल्वे तालुक्यात ६६ के.व्ही. विद्युत प्रकल्प होता. गेल्या १५ – १७ वर्षात विजेची मागणी वाढली. त्यामुळे सहाजिकच ६६ के.व्ही. विद्युत प्रकल्प कमी पडत होता. अशातच विजेची पूर्तता सुरळीत व्हावी यासाठी १३२ के.व्ही. विद्युत प्रकल्प आवश्यक होता. परंतु उलट चांदूर रेल्वे तालुक्यात ६६ के.व्ही. चा विद्युत प्रकल्प हा रद्द करून केवळ ३३ के.व्ही. चा प्रकल्प उभारला गेला. असे करून चांदुर रेल्वे येथील नागरिकांची शासनाने एक प्रकारे थट्टाच केली. आज पूर्ण तालुक्यातील नागरिकांना या कारणाने विनाकारण ट्रांसफार्मर जळणे, विजेचा दाब कमी – जास्त होणे, वारंवार वीज चालू – बंद होणे तसेच उच्च विद्युत दाब होत असल्याने नागरिकांच्या घरची विविध प्रकारची उपकरणे जळणे हा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याशिवाय चांदूर रेल्वे तालुक्यात सोलर प्लांट होत आहे. यासाठी तालुक्यातील शेकडो एकर जमीन कंपन्यांनी घेतली. सदर सोलर प्लांट होत असतांना या प्रकल्पामुळे चांदूर रेल्वे तालुक्याला कोणत्याही प्रकारची मदत होणार नसून सदर प्लांटची वीज ही २० किलोमीटर अंतरावर असलेल्या धामणगाव रेल्वे येथील विद्युत प्रकल्पाला जोडण्यात येत असल्याचे कळते. चांदूर रेल्वे तालुक्यात १३२ के.व्ही. विद्युत प्रकल्प असता तर या सोलर प्लांट चा उपयोग चांदूर रेल्वे वासियांना झाला असता. तरी चांदूर रेल्वे तालुक्यात १३२ के.व्ही. चा विद्युत प्रकल्प उभारावा व तालुका वासियांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे. अन्यथा असे न झाल्यास महावितरण विभागाविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा आम आदमी पार्टीने दिला आहे.
निवेदन देतेवेळी आम आदमी पार्टीचे विदर्भ संघटनमंत्री नितीन गवळी, नेते महेमद हुसेन, राजाभाऊ भैसे, आप तालुकाध्यक्ष सागर गावंडे, शहराध्यक्ष चरण जोल्हे, विनोद लहाने, पंकज गुडधे, कमलसेठ पनपालिया, निलेश होले, प्रकाश खडके, पंकज ठाकरे यांसह अनेकांची उपस्थिती होती.
लोकप्रतिनीधींनी चांदूर रेल्वेचा सुध्दा विचार करावा – नितीन गवळी