अमरावती – महेश बुंदे
भारतीय विद्यामंदिर अमरावती द्वारा संचालित भारतीय महाविद्यालय अमरावती येथे एन. सी. सी. गर्ल्स युनिट महाराष्ट्र गर्ल्स एट बटालियन द्वारा आहार आणि स्वास्थ्य विषयक कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. यामध्ये अमरावतीचे ख्यातनाम आहार तज्ञ डॉक्टर भुपेंद्र गौड यांनी या कार्यशाळेचे मार्गदर्शन केले. भारतीय अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख व एन.सी.सी गर्ल्स बटालियन भारतीय महाविद्यालयाच्या कॅप्टन डॉ. मंगला भाटे यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या प्रसंगी डॉ. भुपेन्द्र गौड यांनी विविध उदाहरणाद्वारे विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य व त्यामध्ये आहाराचे योगदान यावर याचे महत्त्व पटवून दिले. आपली शारीरिक जडण-घडण ही आहार आणि स्वास्थ्यावर अवलंबून असते यासाठी त्याला व्यायामाची जोड मिळणे नितांत आवश्यक आहे हे सांगत स्वस्थ शरीर आणि स्वस्थ मन युवा पिढीला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यात मदत करते असे महत्त्वाचे प्रतिपादन केले तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या व त्यावर विविध उपाययोजनाचे प्रभावी मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांना अनेक प्रश्न विचारले व आपल्या समस्यांचे समाधान करून घेतले. या प्रसंगी बोलताना भारतीय महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. आराधना वैद्य यांनी विद्यार्थ्यांच्या वाढत असलेल्या समस्यांबद्दल चिंता व्यक्त केली. या प्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या आमचं विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क असतो, विद्यार्थ्यांच्या ऊर्जेची पातळी प्रचंड प्रमाणात कार्यरत असते मात्र या ऊर्जेला सकारात्मक व विधायक विचारांची व मार्गदर्शनाची जोड मिळणे नितांत आवश्यक आहे, हे मार्गदर्शन न मिळाल्यास हा युवक आक्रमक होतो व त्याचे जीवन बिघडायला सुरुवात होते. निरोगी व निरामय जीवनासाठी आहार आणि मानसिक स्वास्थ्य याचे मार्गदर्शन ही आजच्या काळाची महत्त्वाची गरज आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
