अमरावती जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण सोमवारपासून

प्रतिनिधी ओम मोरे

अमरावती, दि. २ : पंधरा ते अठरा वयोगटातील वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण उद्यापासून (3 जानेवारी) जिल्ह्यात 40 केंद्रांवर सुरू होणार आहे.

सुरवातीच्या टप्प्यात सुसज्ज उपचार सुविधा उपलब्ध असलेल्या आरोग्य संस्थांमध्ये लसीकरण होणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार विस्तारीकरण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली.

अशी आहेत केंद्रे


अमरावती तालुक्यात अंजनगाव बारी व यावली शहीद, भातकुली तालुक्यात भातकुली ग्रामीण रुग्णालय व खोलापूर, चांदूरबाजार तालुक्यात तळवेल व करजगाव, चांदुर रेल्वे तालुक्यात निमगव्हाण, पळसखेड व आमला विश्वेश्वर, तसेच धामणगाव रेल्वे तालुक्यात धामणगाव ग्रामीण रुग्णालय, तळेगाव दशासर, अंजनसिंगी, दर्यापूर तालुक्यात दर्यापूर उपजिल्हा रुग्णालय व आमला, चिखलदरा तालुक्यात सेमाडोह व चिखलदरा ग्रामीण रुग्णालय, धारणी तालुक्यात धारणी उपजिल्हा रुग्णालय, कळमखार, वरुड तालुक्यात बेनोडा, आमनेर व वरूड ग्रामीण रुग्णालय, तसेच मोर्शी तालुक्यात नेरपिंगळाई व मोर्शी उपजिल्हा रुग्णालय येथे लसीकरण होणार आहे.

तिवसा तालुक्यात मार्डी, तळेगाव ठाकूर, कुऱ्हा, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पापळ व नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालयात लसीकरण होणार आहे.

अंजनगाव सुर्जी तालुक्यात सातेगाव, कापुसतळणी, अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालय, तसेच अचलपूर तालुक्यात अचलपूर सुतिकागृह उपजिल्हा रुग्णालय धामणगाव गढी ही लसीकरण केंद्र असतील.

महापालिकेच्या क्षेत्रात पालिकेच्या सबनीस प्लॉट, विलास नगर, बिच्छू टेकडी येथील रुग्णालये, हरिभाऊ वाठ रुग्णालय व दसरा मैदान येथील आयसोलेशन केंद्र येथे लसीकरण केंद्र असतील.

शिक्षण विभागाशी समन्वय साधा

ग्रामीण भागात कुमारवयीन विद्यार्थ्यांचे अधिकाधिक लसीकरण होण्यासाठी तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागातील तालुका शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण), तसेच शहरात शिक्षण प्रशासन अधिकारी यांच्याशी सहकार्य साधून कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत.

AmaravatiVaccination

बूस्टर डोस १० जानेवारीपासून

हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर यांनी दोन्ही मात्रा घेतल्या असतील तर त्यांना १० जानेवारीपासून प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे. अशा व्यक्तीने दुसरी मात्रा घेतल्यानंतर नऊ महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.

60 वर्षे किंवा त्यावरील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना प्रिकॉशन डोस घेताना लसीकरण केंद्रावर प्रमाणपत्र दाखविण्याची गरज नाही. मात्र, त्यांनी तिस-या मात्रेचा निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेण्याचे आवाहन आहे.

खासगी लसीकरण पूर्वीच्याच दरात

शासकीय लसीकरण केंद्रांवर ही लस विनामूल्य असेल. ज्यांना खासगी लसीकरण केंद्रावर लस घ्यायची आहे, त्यांना केंद्र शासनाने पूर्वी घोषित केलेल्या किमतीतच लसीकरण करता येईल. त्यात कुठलाही बदल नाही.

कोविन ॲपमध्ये नोंदणीच्या सुविधा आहेत

· हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व 60 वर्षे वा त्यावरील सहव्याधी असलेले नागरिक

हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व 60 वर्षे वा त्यावरील सहव्याधी असलेले नागरिक यांना त्यांच्या सध्याच्या कोविन अकाऊंटवरून प्रिकॉशन डोससाठी नोंदणी करता येईल. दुस-या डोसनंतर 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण होणे आवश्यक आहे. यातील व्यक्तींनी कार्यालयाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यांचे लसीकरण केवळ शासकीय केंद्रांवर होईल.

१५ ते १८ वयोगटातील सन २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेले लाभार्थी पात्र राहतील. लाभार्थ्यांना कोविन प्रणालीवर स्वत:च्या मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करता येईल. नोंदणी लसीकरण केंद्रांवरही करता येईल.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!