सुंदर फुलांची बाग, पक्ष्यांसाठी घरटे
स्टेशन मास्तर दीपिका बाजपयी यांचा पुढाकार
चांदूर रेल्वे – प्रतिनिधी सुभाष कोटेचा/धिरज पवार
आजच्या काळात महिला सर्वच क्षेत्रात पुढे जात आहेत. रेल्वे विभागासारखी तनावपुर्ण नोकरी महिला अतिशय चोखपणे पार पाडत आहेत. ही तनावपुर्ण नोकरी करतांना चांदूर रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्तर दीपिका बाजपयी यांनी टाकाऊ वस्तूंचा वापर करून रेल्वे स्थानक वर आकर्षक फुलांच्या फुलवारी, पक्ष्यांसाठी घरटी, इतर आकर्षक वस्तू बनवल्या आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानक रमणीय ठिकाण बनले असून प्रवाशांचे आकर्षण वाढू लागले आहे. दीपिका बाजपयी यांच्या या कामाचे कौतुक होत आहे. या कामासाठी त्यांना स्थानक कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे.

चांदूर रेल्वे स्टेशन भुसावळ-नागपूर मुख्य रेल्वे मार्गावर आहे. एकेकाळी हे सर्वात मोठे तहसील आणि रेल्वे मार्गावरील वाहतुकीचे सर्वात मोठे केंद्र होते. अत्याधुनिक पद्धतीने स्टेशनवर सर्व सुविधा उपलब्ध आहेत. सुसज्ज कार्यालयीन इमारत, टेलिफोन, तिकीट घर, प्लॅटफॉर्म, प्रवाशांच्या बसण्यासाठी सुविधा. दिवसभर आपल्या कुटुंबापासून दूर राहून आणि एक-दोन पॉईंटमन सोबत घेऊन दिवसरात्र रेल्वे खात्यात नोकरी करणे इतके सोपे नाही.

दिवसरात्र रेल्वे गाड्यांची ये-जा आणि कर्कश हॉर्नचा आवाज मनाला अस्वस्थ करते. मात्र या सगळ्याला मात करीत महिला स्टेशन मास्तर दीपिका बाजपयी यांनी स्टेशन परिसर सुंदर रमणिय केला आहे. स्त्रिया घरी अंगणाच्या आवारात सुंदर फुले लावते. पण ज्या ठिकाणी आपण काम करतो, नोकरी करतो, तो परिसर आपल्या अंगना सारखा रमणीय बनवला पाहिजे, असे फार कमी ठिकाणी दिसते. रेल्वे स्थानक म्हणजे भटके कुत्रे, अस्वच्छता, भिकाऱ्यांचे आश्रयस्थान ही विचारसरणी सर्वसामान्यांची आहे. मात्र ही सर्व कल्पना बाजूला ठेवून चांदूर रेल्वे स्थानकाचे रूपांतर बागेत झाले आहे. स्थानकाचा कायापालट पाहून ट्रेनमधून उतरणारे प्रवासी थक्क झाले आहेत. नोकरीधारक आठ तास ड्युटी केल्यानंतर परिवारात व्यस्त होतात, पण काही मोजकेच अधिकारी आहेत जे आपल्या कार्यालयाला घरासारखे बनवितात त्यापैकीच एक म्हणजे दीपीका बाजपयी.

फुलवारी आणि पक्ष्यांची घरटी
येथे निशिगंधा, चंपा, चमेली, शेवंती, अष्टर, सुंदर वेली अशी अनेक फुलझाडे लावली आहेत. त्याचबरोबर पक्ष्यांचा किलबिलाट त्यांच्या कानावर सतत पडावा यासाठी त्यांनी कागदी खोक्यापासून घरटी ही तयार केली. आणि पक्ष्यांसाठी त्यात पाणी व धान्य ठेवले आहे.

टाकाऊ पदार्थापासून बनवलेल्या सर्व वस्तू
कागदी खोके, फिनाईलच्या कॅन, प्लास्टिक डबे, विनाकामाच्या लोखंडी वस्तू, मातीच्या वस्तू या सगळ्या वस्तू माणूस फेकून देतो किंवा भांगरात त्याला विकतो. परंतु चादूर रेल्वे स्थानकावरील या सर्व टाकाऊ वस्तूंना उत्कृष्ट आकार देऊन कुंड्या, पक्ष्यांचे घरटे, वॉटरफॉल, फुलवारी तयार करून परिसर रमणीय करण्यात आला

नोकरीधारकांनी नैसर्गिक वातावरणाशी जुडले पाहिजे – दीपिका बाजपयी
नैतिक जबाबदारी, सामाजिक भान समजून जिथे काम करता तिथे घरासारखे वातावरण तयार केले पाहिजे. त्यामुळे तणावपूर्ण वातावरण निवांत आणि आनंदी होत आहे. त्यामुळे सर्व नोकरीधारकांनी अशा नैसर्गिक वातावरणाशी जुडले पाहिजे अशी अपेक्षा स्टेशन मास्तर दीपिका बाजपयी यांनी व्यक्त केली. तसेच याठिकाणी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून प्रवाशांना येथे रिलॅक्स वाटत आहे.

