केरळ :- त्रिवेंद्रम | केरळमध्ये सध्या पावसानं रौद्र रूप धारण केलं आहे. केरळमधील एकूण सातपेक्षा अधिक जिल्ह्यात पावसानं अक्षरश: जनजीवन विस्कळीत केलं आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांना स्थलांतरित केलं जात आहे.अजूनही पावसाचा जोर कायम असल्यानं राज्य सरकार केंद्र सरकारच्या मदतीनं विस्थापितांची सोय करत आहे.
मुसळधार पाऊस आणि भुस्खलनामुळं राज्यात आतापर्यंत 26 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक नागरिक बेपत्ता आहेत. भुस्खलनाच्या खाली शेकडो नागरिक दबल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. कोट्टायममध्ये पावसाचा जोर सर्वाधिक आहे. या भागात आतापर्यंत 13 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.
